‘गो बॅक’ ट्रेंडमुळे मोदींना बदलावा लागला मार्ग!, काळे झेंडे दाखवून व्यक्त केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 04:12 AM2018-04-13T04:12:15+5:302018-04-13T04:12:15+5:30
कावेरी प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारने नाकर्तेपणाची भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी मोदी विरोधात ‘गोबॅकमोदी’ अशा हॅशटॅगची लाट आली.
चेन्नई : कावेरी प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारने नाकर्तेपणाची भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी मोदी विरोधात ‘गोबॅकमोदी’ अशा हॅशटॅगची लाट आली. तामिळनाडूत पंतप्रधान येत असतानाच त्यांच्या निषेधासाठी घरोघरी, रस्त्यारस्त्यांवर आणि कार्यालयांतही काळे झेंडे, काळे फुगे, काळ्या कपड्यांत लोकांनी आंदोलने केली. गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या राज्यात मोदींविरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून आला.
तामिळनाडूतील तिरुविदंताई येथे आयोजिलेले देशातील सर्वांत मोठे संरक्षणविषयक प्रदर्शन डिफेएक्स्पोचे उद्घाटन करण्याकरिता मोदी आले. त्या वेळी काळे झेंडे दाखवून तामिळी संघटनांनी निषेध नोंदविला. तामिळ भाषकांच्या संघटनांची शिखर संस्था तामिळार वळवूईरिमलाई कुट्टामईप्पू (टीव्हीके) व आमदार थमिमून अन्सारी प्रमुख असलेल्या मनितानेई जननयाग कच्ची या संघटनांनी चेन्नई विमानतळावर पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविले. कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना न केल्याच्या निषेधार्थ द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी, कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, खासदार कनिमोळी व अन्य नेत्यांनी आपल्या घरांवर काळ्या रंगाचे ध्वज लावले होते. इरोडे जिल्ह्यामध्ये द्रमुकच्या काळ्या रंगाचे फुगे सोडून निषेध केला. या प्रकरणी ५० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
>युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
कावेरी प्रश्नासंदर्भात केंद्र व तामिळनाडू सरकारने नाकर्तेपणाची भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ इरोडे येथे धर्मलिंगम या २५ वर्षे वयाच्या एका युवकाने गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तो ९० टक्के भाजला असून
त्याला इरोडे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मलिंगमची मानसिक
स्थिती बिघडली होती, असे पोलिसांनी सांगितले.
टिष्ट्वटरवर पेटले कावेरीचे पाणी : कावेरी जलव्यवस्थापन मंडळ स्थापन करण्यास केंद्र का टाळाटाळ करीत आहे, असा सवालही अनेक लोकांनी ट्विटरवर विचारला. निषेधासाठी घरोघरी, रस्त्यारस्त्यांवर आणि कार्यालयांतही काळे झेंडे, काळे फुगे, काळ्या कपड्यांत लोकांनी
आंदोलने केली.
>‘गो बॅक मोदी' हॅशटॅग वापरून
१५ लाख लोकांचे टष्ट्वीट!
कावेरी प्रश्नी मोदींनी आश्वासने न पाळल्याने त्यांच्या निषेधासाठी तामिळी संघटनांनी गुरुवारी टिष्ट्वटरवर गोबॅकमोदी मोहीम चालविली. हा हॅशटॅग जगभरात दिवसभर ट्रेडिंग होता. जवळपास १५ लाखांहून अधिक लोकांनी या हॅशटॅगचा वापर करून मोदींचा सोशल मीडियावर निषेध केल्याचे दिसून आले.