मोदींनी आश्वासनांची पूर्तता केलेली नाही
By admin | Published: April 4, 2015 11:30 PM2015-04-04T23:30:35+5:302015-04-04T23:30:35+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र, पंतप्रधानदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अद्याप त्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही,
विजय चोप्रा : संमेलनात मोदींवर टीका
घुमान : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र, पंतप्रधानदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अद्याप त्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही, असे मत ‘पंजाबकेसरी’चे मुख्य संपादक विजय चोप्रा यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी चोप्रा यांची मुलाखत घेतली. मोदी यांनी लोकसभेत मिळवलेल्या यशासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर चोप्रा म्हणाले, ‘‘यूपीए सरकारच्या कामावर जनता खूप नाराज होती. त्यावेळच्या प्रस्थापित सरकारविरोधात रोष म्हणून जनतेने मोठ्या प्रमाणात मोदींच्या बाजूने मत दिले. मात्र, आतापर्यंत मोदींनी केवळ आश्वासने दिली. त्याच्या पूर्ततेसाठी फारशी पावले उचललेली नाहीत. महागाई अद्याप कमी झालेली नाही. उलट ती वाढताना दिसत आहे. काळा पैसा देशात परत आणण्यासाठी ठोस पावलेदेखील मोदी सरकारने उचललेली नाहीत.’’
‘पेड न्यूज’बाबतही मोदींवर टीका
‘पेड न्यूज’ संदर्भातही चोप्रा यांनी मोदींवर टीका केली. ‘‘निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मर्यादेच्या आतच सर्व उमेदवार खर्च दाखवतात. प्रत्यक्षात मात्र, त्यापेक्षा जास्त खर्च होतो. खुद्द मोदी यांनीही हेच केले,’’ असे ते म्हणाले. ‘पेड न्यूज’ हे माध्यमांसाठी मोठे आव्हान असल्याचे चोप्रा यांनी यावेळी नमूद केले.