हरयाणात मोदी लाटेचा तडाखा, भाजपाला सर्वच जागांवर आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 03:00 PM2019-05-23T15:00:19+5:302019-05-23T15:03:01+5:30
हरयाणातील सोनिपत मतदारसंघात भाजपचे उमेदवार रमेश चंद्र कौशिक यांनी कॉंग्रेसच्या भूपेंद्रसिंह हुडडा यांच्यावर कायम आघाडी घेतली आहे.
सोनिपत - हरयाणालोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. भाजपाने लोकसभेच्या 10 पैकी 10 जागांवर आघाडी मिळवत हरयाणाच्या मातीतही कमळ खुलवले आहे. हरयाणातील लोकसभेच्या 10 जागांपैकी भाजपाने 9 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, कॉंग्रेसने दोनवेळा रोहतक मतदारसंघात आघाडी घेतली होती. पण, भाजपा उमेदवार अरविंद शर्मा यांनी कॉंग्रेस उमेदवार दिपेंद्रसिंह हुड्डा यांना मात दिली. सोनिपात लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनीही मोदी लाट अद्याप कायम असल्याचे म्हटले आहे.
हरयाणातील सोनिपत मतदारसंघात भाजपचे उमेदवार रमेश चंद्र कौशिक यांनी कॉंग्रेसच्या भूपेंद्रसिंह हुडडा यांच्यावर कायम आघाडी घेतली आहे. हरयाणातील 39 ठिकाणच्या 90 मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. हरयाणातील 10 लोकसभा मतदारसंघात 12 मे रोजी मतदान घेण्यात आले होते. येथे भाजपा, आयएनएलडी आणि कॉंग्रेस या तीन पक्षात प्रामुख्याने लढत होती. हरयाणातील रोहतक आणि सोनिपत मतदारसंघाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात पिता-पुत्र आपले नशीब आजमावत होते. मात्र, भाजपाच्या मोदी लाटेपुढे हुड्डा पिता पुत्रांना पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. गुडगाव लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार इंद्रजीतसिंह यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्याचप्रमाणे, अंबाला, भिवानी, गुज्जर, हिसार, कुरुक्षेत्र, सिरसा, सोनिपत या मतदारसंघात भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत भाजपने 07, इएनएलडीने 2 आणि कॉंग्रेसने एका जागेवर विजय मिळवला होता. सध्याची आकडेवारी पाहता भाजपाला 10 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.