मोदी-जिनपिंग भेटीने संबंधांतील ताण कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:00 AM2018-04-28T02:00:57+5:302018-04-28T02:00:57+5:30
दोन देशांतील संबंध सुधारणेच्या दृष्टीने या बैठका महत्त्वाच्या असल्या तरी त्यात डोकलामचा विषय येण्याची शक्यता कमी आहे.
वुहान (चीन) : डोकलामला वादामुळे भारत-चीन यांच्यातील संबंध अद्याप तणावाचे असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वुहान शहरात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीने दोन देशांतील तणाव कमी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. शी जिनपिंग भारतात आले, तेव्हा त्यांनी मोदी यांना चीनला येण्याचे निमंत्रण दिले होते.
दोन दिवसांत या दोन नेत्यांत सहा बैठका होणार आहेत. दोन देशांतील संबंध सुधारणेच्या दृष्टीने या बैठका महत्त्वाच्या असल्या तरी त्यात डोकलामचा विषय येण्याची शक्यता कमी आहे. ही भेटच अनौपचारिक आहे. अमेरिकेने चीनच्या वस्तुंच्या आयातीवरील कर वाढवल्याचे आपल्या उत्पादनांच्या निर्यातीसाठीसाठी भारताच्या बाजारपेठेकडे चीन लक्ष ठेवून आहे. त्यामुळे व्यवसाय वाढवण्यावरही या चर्चा होणे अपेक्षित आहे.
आंतराष्ट्रीय व आशियातील प्रश्नांवर आज चर्चा झाल्याचे कळते. वुहानमधील हुबे म्यूझियममध्ये मोदींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याआधी साबरमतीमधील गांधीजींच्या आश्रमात मोदी व जिनपिंग यांच्यात पहिली अनौपचारिक बैठक झाली होती. त्यानंतरची ही दुसरी अनौपचारिक भेट आहे. या बैठकीत डोकलामविषयी चर्चा होणार नसेल, तर या भेटीला काहीच अर्थ नाही, अशी टीका काँग्रेसने मोदी यांच्या भेटीच्या निमित्ताने केली आहे. (वृत्तसंस्था)
पूर्वतयारी होती सुरू
या दोन नेत्यांच्या भेटीच्या पूर्वतयारीसाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्रमंत्री विजय गोखले, भारताचे चीनमधील राजदूत गौतम बंबावाले यांनी अनेक चिनी नेत्यांशी चर्चा केली होती. याच आठवड्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या चीनमध्ये परिषदेसाठी उपस्थित होत्या.