मोदी हे ‘मौनी बाबा’; खरगेंची टीका, महाराष्ट्रातील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:21 AM2018-01-04T04:21:58+5:302018-01-04T04:22:11+5:30
कोरेगाव भीमा वादाच्या निमित्ताने राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत रणकंदन झाले. ज्या विषयांवर पंतप्रधानांना बोलायचे नसते, त्यावेळी ते ‘मौनी बाबा’ होतात, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
अमृता कदम
नवी दिल्ली - कोरेगाव भीमा वादाच्या निमित्ताने राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत रणकंदन झाले. ज्या विषयांवर पंतप्रधानांना बोलायचे नसते, त्यावेळी ते ‘मौनी बाबा’ होतात, अशी टीका काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. महाराष्ट्रातील हिंसाचारावर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
लोकसभेत शून्य प्रहरात हा प्रश्न खरगेंनी उपस्थित केला. दरवर्षी दलित बांधव तिथे जमा होतात. पण असा हिंसाचार कधीच झाला नव्हता. याचवर्षी अशी स्थिती का उद्भवली? हिंसाचाराला खतपाणी कोणी घातले? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्याशी संबंधित संघटना हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची मागणी त्यांनी
केली. विरोधक आणि सत्ताधाºयांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
महाराष्ट्रात जातीय संघर्ष कधीच नव्हता. या संघर्षाला मराठा विरुद्ध दलित असा जातीय रंग दिला जात आहे.
- शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना
राज्यसभाही तहकूब
राज्यसभेतही कोरेगाव भीमाचे पडसाद उमटले. काँग्रेस सदस्या रजनी पाटील आणि आनंद शर्मा तसेच बसपचे खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी याप्रकरणी चर्चा व्हावी, अशी मागणी वारंवार केली. भाजपशासित राज्यांमध्ये दलितांवर अत्याचार वाढत असल्याचाही आरोप सतीशचंद्र मिश्रांनी केला. सभापती व्यंकय्या नायडूंनी चर्चेची मागणी परवानगी नाकारल्यानंतर गोंधळ सुरू झाला. त्यातच कामकाज वाहून गेले.