मोदी आजपासून रशिया भेटीवर
By Admin | Published: December 23, 2015 02:20 AM2015-12-23T02:20:32+5:302015-12-23T02:20:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या रशिया भेटीवर जात आहेत. वार्षिक शिखर बैठकीत ते रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्याशी चर्चा करतील.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या रशिया भेटीवर जात आहेत. वार्षिक शिखर बैठकीत ते रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्याशी चर्चा करतील. अणुऊर्जा, हायड्रोकार्बन, संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतानाच सामरिक संबंध बळकट करण्याचा या भेटीमागे उद्देश आहे.
जुने मित्र अशी ओळख असलेल्या या दोन देशांचे नेते गुरुवारी चर्चेनंतर अणुऊर्जा आणि संरक्षणासह विविध करारांवर स्वाक्षऱ्या करतील. या करारांना अंतिम आकार दिला जात असल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकारांना सांगितले. मॉस्को आणि नवी दिल्ली येथे २००० पासून या दोन देशांमध्ये उच्च स्तरावर आलटून-पालटून चर्चा केली जात आहे. आर्थिक संबंधाच्या विस्ताराला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून पुढील १० वर्षांत द्विपक्षीय व्यापार सध्याच्या १० अब्ज अमेरिकन डॉलरवरून ३० अमेरिकन डॉलरवर नेण्यावर भर असेल. सिरियातील परिस्थिती आणि दहशतवादासारख्या जागतिक मुद्यांवरही दोन नेते चर्चा करतील, ही निश्चितच आमच्यासाठी मोठी कटिबद्धता असेल, असे जयशंकर यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)