मनमोहन सिंग मंचावर येताच विद्यार्थ्यांनी 'मोदी-मोदी' घोषणा दिल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 10:28 AM2019-09-08T10:28:31+5:302019-09-08T10:29:40+5:30
जयपूरमधील महाविद्यालयाच्या कार्यक्रमात घडला प्रकार
जयपूर: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जयपूरमधील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. मनमोहन सिंग व्यासपीठावर येताच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. काही वेळ विद्यार्थ्यांची घोषणाबाजी सुरू होती. यानंतर माजी पंतप्रधानांनी भारतीय लोकशाही आणि अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. यावेळी सिंह यांचा जेकेएलयू लॉरेट पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.
उदारीकरणाच्या धोरणांवर उभ्या असलेल्या आर्थिक सुधारणा सुरुच राहायल्या हव्यात असं मत मनमोहन सिंग यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केलं. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था शक्य आहे. मात्र त्यासाठी एक ठोस योजना असायला हवी, असं माजी पंतप्रधान म्हणाले. गरिबी, सामाजिक असमानता, सांप्रदायिकता, धार्मिक कट्टरता आणि भ्रष्टाचार या लोकशाही समोरच्या प्रमुख समस्या असल्याचं सिंग यांनी म्हटलं.
देशावरील मंदीचं सावट, घसरलेला जीडीपी यावरदेखील मनमोहन सिंग यांनी भाष्य केलं. 'सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ अतिशय संथ गतीनं होत आहे. जीडीपी घसरला आहे. गुंतवणुकीवरही परिणाम झाला आहे. शेतकरी संकटात आहे. बँकिंग व्यवस्थेसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. बेरोजगारी वाढत आहे. या परिस्थितीतही पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठलं जाऊ शकतं. मात्र त्यासाठी विचारपूर्वक रणनिती आखून तिची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी,' असं प्रतिपादन सिंग यांनी केलं. सरकारनं कर दहशतवाद रोखायला हवा, इतरांच्या विचारांना सन्मान करायला हवा, असंदेखील ते म्हणाले.
उदारीकरणाच्या पायावर उभ्या असलेल्या आर्थिक सुधारणा कायम ठेवणं ही काळाची गरज असल्याचं मत राज्यसभेचे खासदार असलेल्या मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलं. देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. देशाचं सामर्थ्य संविधानात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी संविधानातील मूल्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असायला हवं, असं माजी पंतप्रधान म्हणाले.