मोदींना चांगल्या वैज्ञानिक सल्लागारांची गरज
By admin | Published: January 11, 2016 02:48 AM2016-01-11T02:48:59+5:302016-01-11T02:48:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरवायचा असेल आणि मिशन प्रकल्प सुरू करायचे असतील तर चांगल्या वैज्ञानिक सल्लागारांची गरज असल्याचे भारतरत्न
बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात उतरवायचा असेल आणि मिशन प्रकल्प सुरू करायचे असतील तर चांगल्या वैज्ञानिक सल्लागारांची गरज असल्याचे भारतरत्न विजेते वैज्ञानिक सीआर राव यांनी स्पष्ट केले.
एका मुलाखतीत त्यांनी मोदींचे विज्ञान धोरण, धर्म, असहिष्णुता, मदर टेरेसा यांचा संत दर्जा आदी मुद्यांवर दिलखुलास भाष्य केले.
प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला विज्ञानविषयक दृष्टिकोन आहे, असे वाटते काय?
उत्तर : निश्चितच ते दृष्टिकोन लाभलेले नेते आहेत. त्यांना काही तरी करायचे आहे, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. ते केवळ चांगला सल्ला मानतीलच असे नाही, तर सर्व विस्मयकारी कल्पना प्रत्यक्षात आणतील अशी आशा करू या. तुम्ही त्यांचे भाषण ऐकता तेव्हा ते चांगले काम करतात हे स्पष्टच दिसून येते.
प्रश्न : आपण अनेक पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेत सल्लागाराची भूमिका बजावली असून, सध्या ही परिषद मोडीत काढण्यात आली आहे. मोदींना योग्य वैज्ञानिक सल्ला मिळत आहे, असे तुम्हाला वाटते काय?
उत्तर : विज्ञान असो की, समाज कोणतीही एक व्यक्ती किंवा मंत्रालय एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रश्न हाताळू शकत नाही. योग्य सल्ला देण्यासाठी मोदींना योग्य लोक मिळतील अशी मला आशा आहे. विज्ञानाची कास धरीत अन्य जगाशी स्पर्धा करताना आपल्याला गरिबीचा प्रश्न सोडवायचा आहे. अवकाश संशोधनातही आघाडी घ्यायची आहे. या सर्व बाबी हाती घ्यायच्या असताना मोदींनी प्राधान्यक्रम ठरवायला हवा.
प्रश्न : मोदी विज्ञानाला अधिकाधिक चालना कसे देतील?
उत्तर : मोदींनी चांगल्या संस्थांना कमीत कमी का होईना निधी द्यावा. त्यासाठी सध्या सुरू असलेले मूलभूत प्रयत्न थांबविण्याची गरज नाही. रोगनिदान, नवे ऊर्जा तंत्रज्ञान, नवीन अत्याधुुनिक सामग्री आदींसाठी किमान १०-२० कोटी रुपयांचा छोटा निधी देऊन साध्या छोट्या वैज्ञानिक कार्याला व्यापक केले जाऊ शकते. निवडक क्षेत्रात मोठ्या निधीची गरज आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यातही मला भारतातून नव्हे, तर बाहेरून पैसा मिळाला. (वृत्तसंस्था)