मोदी-नितीशकुमार बिहारमध्ये जुगलबंदी
By admin | Published: July 25, 2015 11:28 PM2015-07-25T23:28:49+5:302015-07-25T23:28:49+5:30
पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर प्रथमच बिहारच्या दौऱ्यावर आलेले नरेंद्र मोदी आणि त्यांचे कट्टर विरोधक बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे दोघे शनिवारी काही प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या
पाटणा : पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर प्रथमच बिहारच्या दौऱ्यावर आलेले नरेंद्र मोदी आणि त्यांचे कट्टर विरोधक बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे दोघे शनिवारी काही प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले आणि दोघांची जुगलबंदी चांगलीच रंगली. उभय नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना, मोदींच्या दौऱ्याने राजकीय वातावरण आणखी तापले. व्हेटरनरी कॉलेज मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीशकुमार यांनी राजकारणामुळे राज्याच्या विकासात किती अडसर झाला, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोदींना सात प्रश्नही विचारले. त्याला प्रत्युत्तर देताना मोदींनी राज्याला ५० हजार कोटींवर पॅकेज देण्याचे आश्वासन देऊन मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न केला.
कुमार यांचे नवे सहकारी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना कोपरखळी मारताना केंद्रात वाजपेयी सरकारनंतर येथून आलेल्या रेल्वेमंत्र्यांनी काम रखडवले, असे ते म्हणाले.
राजकारणामुळे राज्याच्या विकासात किती अडसर निर्माण झाला, याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी आताच दिली, याकडे लक्ष वेधून मोदी यांनी सांगितले की, वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात जे प्रकल्प पूर्णत्वास यायला हवे होते त्याला २०१५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. २००४ च्या लोकसभा निवडणुका सहा महिन्यानंतर झाल्या असत्या तर काम तेव्हाच पूर्ण झाले असते, या नितीशकुमारांच्या मताशी मी सहमत आहे.
विशेष म्हणजे, त्यांनी नितीशकुमारांची मुक्तकंठाने प्रशंसाही केली. तत्पूर्वी, नितीशकुमार यांनी पंतप्रधानांना अप्रत्यक्षपणे ज्या आयआयटी, पाटणा परिसराचे लोकार्पण ते करीत आहेत त्याचे काम २००८ मध्येच सुरू झाले होते आणि राज्य सरकारने यासाठी ५०० एकर जमीनही दिली आहे. याशिवाय वाजपेयी सरकारने सहा महिन्याआधी लोकसभा निवडणुका घेतल्या नसत्या तर बिहार शरीफ-दनियावा रेल्वेमार्गाचे काम आपण रेल्वेमंत्री असतानाच पूर्णत्वास आले असते, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. कुमार यांनी आज ज्या काँग्रेस आणि राजदसोबत मैत्री केली आहे, त्यांनीच रेल्वे प्रकल्प चालू करण्यास विलंब केला आणि यामागे राजकीय कारण होते, हे मोदींनी इशाऱ्या इशाऱ्यातच सांगितले आणि आपले सरकार बिहारच्या विकासात कुठलेही राजकारण करणार नाही, असे आश्वासन दिले.
मुजफ्फरपूरमधील सभेत मात्र मोदींनी नितीशकुमारवर कडाडून टीका केली. त्यांच्यावर बिहारमधील लोकांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपही केला. (वृत्तसंस्था)
पंतप्रधानांना विचारलेले सात प्रश्न
-आपण बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले?
-अच्छे दिनची प्रतीक्षा केव्हा संपणार?
- काळा पैसा परत येणार का?
-शेतकऱ्यांना किमान मूल्य देण्याचे आश्वासन कधी पूर्ण होणार?
-२०२२ पर्यंत सर्वांना घर, वीज आणि पाणी कसे मिळणार?
-निधीशिवाय योजना कशा पूर्ण करणार?
-जनधन योजनेतील ७० टक्के खाती निष्क्रिय आहेत. या खात्यांच्या माध्यमाने देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना कधी मदत करणार?
आमच्यात मतभेद निर्माण करण्याचा डाव - लालूप्रसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेने दुखावलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्यावर बिहारमधील लोकांचा अपमान आणि मुख्यमंत्री नितीशकुमार व आपल्यात मतभेद निर्माण करण्याचा आरोप केला.
संजद आणि राजदने राज्याची किती सेवा केली आहे, याची जाणीव येथील जनतेला आहे. मोदी आमच्यापैकी एकाची प्रशंसा करून दुसऱ्यावर टीका करीत आहेत. आमच्यात फूट पाडण्याचा त्यांचा डाव स्पष्ट दिसून येतो.
मोदींचा बिहार दौरा अपयशी - काँग्रेस
काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांचा बिहार दौरा अपयशी ठरल्याचा दावा करतानाच, या राज्यातील लोकांना मोदींचा खरा चेहरा माहीत असून ते त्यांच्या भूलभुलय्यात अडकणार नाहीत, असा विश्वास जाहीर केला आहे. पक्षाचे प्रवक्ते शकील अहमद यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मोदींचा बिहार दौरा निराशाजनक असल्याचे सांगितले.
राज्यात विकासाऐवजी साप आणि विषाचीच चर्चा सुरू आहे. कोण साप आहे आणि कोण नाही. कोण विष पितो आणि कोण पाजतो. हा तुमचा परस्परांमधील प्रश्न आहे. याचा निर्णय चारभिंतीआड झाला पाहिजे. बिहारच्या लोकांना विष प्राशन करण्यास बाध्य करू नका.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान