मोदी-नितीशकुमार, लालू यांच्यात जुंपली
By admin | Published: August 10, 2015 01:35 AM2015-08-10T01:35:19+5:302015-08-10T15:30:33+5:30
बिहारचे राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्याविरुद्ध एकत्र उभ्या ठाकलेल्या नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांच्यातील वाकयुद्धाने तापले
Next
गया/ पाटणा : येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या बिहारचे राजकारण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्याविरुद्ध एकत्रितपणे शड्डू ठोकून उभ्या ठाकलेल्या नितीशकुमार व लालूप्रसाद यादव या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपलेल्या वाक्युद्धाने कमालीचे तापले. गेल्या बिहार भेटीत मोदींनी 'डीएनए'वरून नितीशकुमार यांना डिवचले होते. रविवारी त्यांनी बिहारला 'जंगलराज' व 'बिमारू राज्य' म्हटल्याने नितीश-लालू त्यांच्यावर तुटून पडले.
मजेची गोष्ट अशी की या नेत्यांमधील हे तुंबळ शरसंधान दोन भिन्न संपर्क माध्यमांतून झाले. गया येथे झालेल्या भरगच्च 'परिवर्तन रॅली'त श्रोत्यांशी थेट संवाद साधण्याच्या आपल्या खास शैलीत मोदी नितीशकुमार व लालूप्रसाद यांच्यावर तुटून पडले. या दोन्ही बिहारी नेत्यांनी मात्र पंतप्रधानांवर ट्विटरच्या आडून शरसंधान केले. मोदींची सभा सुरू होण्याआधीच नितीशकुमार काही ट्विट करत तलवार परजून सज्ज झाले होते. मोदी भाषणात काय बोलले हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी आणि लालूप्रसाद यांनी त्यातील मुद्दय़ांचा परार्मष घेत पंतप्रधानांवर प्रतिटोले लगावले. गेल्या २५ वर्षांत तुम्ही केवळ राज्यातील सत्ताधार्यांचा अहंकार, त्यांच्याकडून होणारा अन्याय आणि फसवणूकच बघितली आहे. येत्या पाच वर्षांसाठीही तुम्ही अशाच नेत्यांच्या हाती सत्ता सोपवणार का, असा सवाल मोदींनी बिहारच्या जतनेला केला.
भाजपा आणा, जंगलराज टाळा
बिहारमधील 'जंगलराज' संपवायचे असेल, एक नवे आधुनिक राज्य निर्माण करायचे असेल तर भाजपाला निवडून द्या. पुन्हा 'जंगलराज पार्ट २' आले तर विनाश अटळ आहे, असे मोदी म्हणाले.
चारा घोटाळ्यात दोषी ठरविण्यात आल्याबद्दल लालूप्रसाद यादव यांच्यावरही मोदींनी तोंडसुख घेतले. जे लोक 'जंगलराज'दरम्यान तुरुंगात गेले, ते वाईट गोष्टी शिकून परतले आहेत. जंगलराज पार्ट १मध्ये तुरुंगाचा अनुभव नव्हता. जंगलराज पार्ट २ आलेच तर आता तुरुंगाचा अनुभवही जोडला गेलेला असेल. राजदचा अर्थच 'रोजाना जंगलराज का डर' असा आहे, असा टोला त्यांनी लगावला.
भूजंग प्रसाद कोण? चंदन कुमार कोण?
अलीकडे नितीशकुमार यांनी स्वत:ला चंदनाची उपमा तर लालूप्रसाद यांना कथितरीत्या विषारी सापाची उपमा दिली होती. यावरही मोदींनी टीका केली. येथे 'भूजंग प्रसाद' कोण? आणि 'चंदन कुमार' कोण आहे? हेच आम्हाला कळलेले नाही. कोण कुणाला विष पाजत आहे, तेही कळायला मार्ग नाही, असे मोदी म्हणाले. निवडणुका झाल्यावर खरा 'विषप्रयोग' दिसेल, असा चिमटाही त्यांनी काढला.
ट्विटर सरकारवर टीकाही ट्विटनेच
मोदी सरकार हे केवळ 'ट्विटर सरकार' बनले आहे, अशी टीका करण्यासाठी नितीश कुमार यांनी स्वत:ही ट्विटरचाच आधार घेतला. केंद्रातील मोदी सरकार 'ट्विटर सरकार' आहे, याची अलीकडे खात्री पटू लागली आहे. हे सरकार तक्रारी ट्विटरवरून ऐकते. त्या तक्रारीला प्रतिसादही ट्विटरवरूनच दिला जातो आणि कारवाईही ट्विटरवरूनच होते, असे जिव्हारी लागणारे ट्विट नितीश यांनी मोदींची सभा सुरू होण्याआधी केले.
सभेनंतर केलेल्या केलेल्या ट्विटमध्ये मोदींना टोमणे मारताना त्यांनी म्हटले की, जनतेवरील जुलूम आणि अत्याचारांच्या संदर्भात वाजपेयीजींनी आपल्याला राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता हे सर्व देश जाणतो.. आधी डीएनए व आता बिहारला 'बिमारू' आणि बिहारवासीयांना अभागी संबोधून मोदी बिहारवासीयांबद्दलचा आपला पूर्वग्रहच जगजाहीर करीत आहेत.
जंगलराज विरुद्ध मंडलराज
मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना लालू यांनी ट्विटरवर म्हटले- जे जंगलराज-२ची भीती दाखवीत आहेत ते स्वत:च मंडलराज-२ने भयभीत झाले आहेत.
आता मंडलराज-२ वि. कमंडलराज अशी लढाई होईल.. पंतप्रधानांनी जरा स्वत:च्या सव्वा वर्षाच्या कारकिर्दीनिमित्तही बोलावे. भुतकाळातील भूत न होता भविष्यात पाहावे!
बिहार निवडणुका जवळ आल्याने मोदींचे मानसिक संतुलन ढळले आहे व लोक आता त्यांच्याकडे एक 'विनोद' म्हणून पाहू लागले आहेत.. मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा पार खालच्या पातळीवर नेऊन ठेवली आहे. बिहारमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि रामविलास पासवान यांनी एकत्रितपणे शड्डू ठोकून विरोधकांना आव्हान दिले.