मोदी फुकट नाही, भाडं भरून विमान वापरतात - गौतम अदानी
By admin | Published: July 11, 2016 03:05 PM2016-07-11T15:05:09+5:302016-07-11T15:05:09+5:30
गुजरातमध्ये केवळ आमच्याकडे चार्टर्ड विमानं असून नरेंद्र मोदी पैसे भरून आमची विमानं वापरतात असे स्पष्टीकरण अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी दिले
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - गुजरातमध्ये केवळ आमच्याकडे चार्टर्ड विमानं असून नरेंद्र मोदी पैसे भरून आमची विमानं वापरतात असे स्पष्टीकरण अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी दिले आहे. मोदीच नाही तर सर्व पक्षांचे नेते आवश्यकतेप्रमाणे आमची विमानं भाडं भरून वापरतात, आणि कुणीही कुणावर आर्थिक कृपादृष्टी ठेवत नाही असे अदानी यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
मोदी आमच्यावर विशेष मेहेरबान असल्याचा आरोप हा राजकीय असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे अदानी म्हणाले आहेत. आम्हा उद्योजकांना सगळ्या पक्षांसोबत काम करावं लागतं असं सांगताना, जिथे ग्राह्य आहे, कायदेशीर आहे, अशी सगली मदत आम्ही सगळ्याच नेत्यांकडे मागत असतो, यात काहीही गैर नसल्याचे सांगताना, मोदी अथवा भाजपानेही कायद्याबाहेर जाऊन आपल्याला काही मदत केलेली नाही असा दावा अदानी यांनी केला आहे.
काँग्रेसचे नेते व माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश ज्या 200 कोटी रुपयांच्या दंडाबाबत बोलत आहेत, त्या खाणीची मालकी आमच्याकडे नसून राजस्थान सरकारकडे आहे असे अदानी म्हणाले. एवढेच नाही तर, या खाणीला हिरवा कंदील खुद्द जयराम रमेश यांनीच दिला होता, आणि त्यावेळी राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार होते. आता दोन्हीकडे सत्ताबदल आला असल्याने रमेश यांचे आरोप राजकीय आहेत, त्यात काही तथ्य नाही असेही अदानी यांनी म्हटले आहे.
आम्हा उद्योजकांना व्यवसाय करू द्यावा, त्यांचा राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वापर करू नये अशी अपेक्षा अदानी यांनी व्यक्त केली आहे. अदानी समूहाला काँग्रेसने 200 कोटी रुपयांचा दंड केला आणि तो भाजपा सरकारने रद्द केला असे सांगण्यात येत होते. मात्र, भाजपाचे माजी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांनी असा कोणताही दंड आम्ही माफ केला नसल्याचे जाहीर केले.
याबाबत बोलताना, अदानी म्हणाले की, त्या खाणींसदर्भात आम्ही कंत्राटदार आहोत आणि आम्हाला काम 2011 मध्ये मिळाले. शिवाय, पर्यावरणाची नासाडी झाली ती आधीच्या काळात झाली असल्याने आम्ही कसा काय दंड भरणार अशी आमची बाजू असून, याबाबत अद्याप कुणीच काही सांगू शकत नाहीये. आम्ही कुठलाही कायदा मोडणार नाही, पर्यावरणाचे संरक्षण करून कायदेशीर कामच करू असेही अदानी म्हणाले.