मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित नाही!
By Admin | Published: January 18, 2016 03:33 AM2016-01-18T03:33:25+5:302016-01-18T03:33:25+5:30
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहिलेला नाही. देशाला आतून आणि बाहेरून गंभीर धोका निर्माण झालेला आहे आणि याच कारणांमुळे अति सुरक्षित पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता,
एस.पी. सिन्हा, पाटणा
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहिलेला नाही. देशाला आतून आणि बाहेरून गंभीर धोका निर्माण झालेला आहे आणि याच कारणांमुळे अति सुरक्षित पठाणकोट एअर बेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, अशा शब्दांत राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी रालोआ सरकारवर हल्लाबोल केला.
रविवारी राजदच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत लालूप्रसाद यादव यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. पक्षाध्यक्षपदी आरूढ होण्याची ही त्यांची नववी वेळ आहे. फेरनिवड झाल्यानंतर यादव यांनी राजदची राष्ट्रीय परिषद आणि नवव्या खुल्या अधिवेशनाला संबोधित केले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित राहिलेला नाही. एकीकडे मोठमोठे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे दहशतवादी पठाणकोटसारख्या अति सुरक्षित क्षेत्रात घुसून आपले नापाक मनसुबे यशस्वी करीत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीतील विजय हा मर्यादित आहे. हा लढा अंतिम शेवटास नेला जाईल. अन्य राज्यांमध्येही बिगर भाजप पक्षांची आघाडी करू. दिल्लीत जनताभिमुख सरकार स्थापन करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या दिशेने मी स्वत: पुढाकार घेईन. बाराव्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित अडचणी व गरिबांच्या समस्या दूर केल्या पाहिजेत, असे यादव म्हणाले.
तत्पूर्वी, लालूप्रसाद यादव यांची राजदच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्यांची पक्षाध्यक्षपदी फेरनिवड केली जाण्याची ही सलग नववी वेळ आहे. राजदच्या राष्ट्रीय परिषदेच्या खुल्या अधिवेशनात यादव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व माजी खासदार जगदानंद सिंग यांनी जाहीर केले. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी असेल.