चीनला डायरेक्ट चॅलेंज करणारे मोदी जगातील एकमेव नेते - अमेरिकन एक्सपर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 12:36 PM2017-11-17T12:36:03+5:302017-11-17T12:43:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या हिताला पहिले प्राधान्य देणारे नेते आहेत. ते आशिया खंडातील अन्य देशांसोबत मिळून चीनचे वर्चस्व, प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या हिताला पहिले प्राधान्य देणारे नेते आहेत. ते आशिया खंडातील अन्य देशांसोबत मिळून चीनचे वर्चस्व, प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनला त्याचीच चिंता सतावत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मोदींच्या रणनितीची पूर्ण कल्पना असून ते मोदींकडे त्याच दृष्टीकोनातून पाहतात असे निरीक्षण बोनी एस ग्लासर यांनी नोंदवले आहे.
अमेरिकन तज्ञ बोनी एस यांचा चीनच्या विषयावर गाढा अभ्यास आहे. भारताबरोबर तणावपूर्ण संबंध ठेऊन आपल्याला काहीही उपयोग होणार नाही हे चीनला कळून चुकले आहे. भारताची धोरणे आपल्या हिताच्या आड येणार नाही असे चीनला वाटत होते पण तसे घडले नाही. त्यांचा अंदाज चुकला असे ग्लासर म्हणाल्या. डोकलाममधल्या घडामोडींवर ग्लासर यांचे बारीक लक्ष होते. डोकलाममध्ये 70 पेक्षा जास्त दिवस भारत आणि चीनचे सैन्य परस्परासमोर उभे ठाकले होते.
डोकलाममध्ये रस्ता बांधण्यापासून भारताने चीनला रोखले होते. भविष्याच्या दृष्टीकोनातून चीन भारताकडे एक आव्हान म्हणून पाहतो. भारताचे अन्य देशांबरोबरचे सहकार्याचे जे संबंध आहेत खासकरुन जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकबरोबर दृढ होणा-या संबंधांमुळे चीन चिंतित आहे असे ग्लासर म्हणाल्या. चीनच्या वन बेल्ट वन रोड धोरणाला ठामपणे विरोध करणारा भारत जगातील एकमेव देश आहे.
भारताच्या लष्करी सामर्थ्याचा किंवा अणवस्त्रांचा चीनला धोका वाटत नाही पण भारताच्या राजकीय धोरणांची चीनला चिंता आहे.
चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी भारताने अन्य देशांबरोबर दृढ संबंधांवर भर दिला त्याच भारताच्या खेळीमुळे चीनची डोकेदुखी वाढली आहे. डोकलाम वादात भारताने घेतलेल्या ठोस भूमिकेचा जो निकाल लागला. त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. चीन बरोबर सीमावाद असलेले आशिया खंडातील अन्य देश सुद्धा भविष्यात अशीच भूमिका घेऊ शकतात असे निरीक्षण ग्लासर यांनी नोंदवले.