‘इसिस’च्या नावे मोदी, पर्रीकर यांना धमकी
By admin | Published: January 20, 2016 03:23 AM2016-01-20T03:23:18+5:302016-01-20T03:23:18+5:30
गोवा सरकारला मिळालेल्या एका निनावी पत्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
पणजी : गोवा सरकारला मिळालेल्या एका निनावी पत्रामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इस्लामिक स्टेट्स आॅफ इराक अॅण्ड सीरियाच्या (इसीस) नावाने ही धमकी देण्यात आली असून गोवा पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.
गोव्याच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे पाच दिवसांपूर्वी ही धमकी देण्यात आली होती. गोव्यात लागू असलेल्या गोहत्याविरोधी कायद्याच्या अनुषंगाने ही धमकी होती. त्यात थेट पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले असून पत्राच्या खाली ‘आयएसआयएस’ असे लिहिण्यात आले आहे. हे पत्र गोवा सरकारने पोलीस मुख्यालयाकडे दिले आहे. मुख्यालयाने दहशतवादविरोधी पथकाकडे तपास सोपविला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. राज्यातील सर्व पोलीस स्थानकांना या पत्राच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)