मोदी पंतप्रधान; शहेनशहा नाहीत
By admin | Published: June 1, 2016 03:49 AM2016-06-01T03:49:11+5:302016-06-01T03:49:11+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात साजरा करण्यात येत असलेल्या आनंदोत्सवावर सडकून टीका केली आहे.
रायबरेली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात साजरा करण्यात येत असलेल्या आनंदोत्सवावर सडकून टीका केली आहे. मोदी देशााचे पंतप्रधान आहेत, शहेनशहा नाहीत. परंतु त्यांच्या मंत्र्यांना याचे भान राहिले नसून एखाद्या शहेनशहाप्रमाणे ते उत्सव साजरा करीत आहेत, अशी तोफ त्यांनी डागली.
सोनिया गांधी त्यांच्या रायबरेली मतदारसंघात दोन दिवसांच्या
दौऱ्यावर आल्या आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी डलमऊ येथे पोहोचल्यावर पत्रकारांशी
बोलताना त्यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढविला.
मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंत्र्यांद्वारे साजरा करण्यात येत असलेल्या उत्सवाकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, मी आजवर असे कधी बघितले नाही. देशात दुष्काळ पडला आहे. शेतकरी संकटात आहेत.
गरिबीने लोकांचे बेहाल आहेत. अशा परिस्थितीत उत्सव साजरे करणे कितपत योग्य आहे? मी असा पंतप्रधान कधीच बघितला नाही. (वृत्तसंस्था) भाजपाचा प्रतिहल्ला
रॉबर्ट वाड्रा यांचा बचाव आणि पंतप्रधानांना शहेनशहा संबोधित केल्याबद्दल भाजपाने सोनिया गांधींवर पलटवार केला. काँग्रेस अध्यक्षांच्या बचावाने
वाड्रा केवळ एक नागरिक आहेत या खोटारडेपणाचा पर्दाफाश झाला असून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने शहेनशहाचा बोऱ्याबिस्तर बांधला होता, अशी टीका या पक्षाने केली.
वाड्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करा या गांधी यांच्या आव्हानावरही भाजपाने फिरकी घेतली. विरोधी पक्षाने यापूर्वीच सूडभावनेने प्रेरित असल्याचे म्हटले होते, राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी लक्ष वेधले.