मोदींचा कोट गेला ४.३१ कोटींना!
By admin | Published: February 21, 2015 04:00 AM2015-02-21T04:00:45+5:302015-02-21T04:00:45+5:30
राजकीय वादळाचे कारण ठरलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोनोग्राम असलेला बहुचर्चित कोट शुक्रवारी अखेर तब्बल ४ कोटी ३१ लाख रुपयांना विकला गेला!
सूरत : राजकीय वादळाचे कारण ठरलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोनोग्राम असलेला बहुचर्चित कोट शुक्रवारी अखेर तब्बल ४ कोटी ३१ लाख रुपयांना विकला गेला! दिवसागणिक चढती किंमत बघून मोदींच्या या गडद निळ्या रंगाच्या कोटाचा नेमका किती रुपयांत लिलाव होणार, याकडे लक्ष वेधले होते. हा सूट धर्मानंद डायमंड कंपनीचे लालजी पटेल आणि त्यांचे पुत्र हितेश पटेल यांनी खरेदी केला असल्याची घोषणा जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार यांनी सायंकाळी ५ वाजता हा तीन दिवसांचा लिलाव संपविताना केली.
लिलावाच्या शेवटच्या एक तासात बोलीदारांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली होती. स्थानिक सायन्स कन्हेंन्शन सेंटरमध्ये तीन दिवस चाललेल्या या लिलावात मोदी यांच्या कोटाशिवाय त्यांना पंतप्रधान झाल्यानंतर मिळालेल्या भेटवस्तूही ठेवण्यात आल्या होत्या. यातून उभा होणारा पैसा स्वच्छ गंगा मोहिमेसाठी वापरला जाणार आहे. गेल्या २५ जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत मोदी यांनी हा सूट परिधान केला होता. देशहिताचे कार्य करण्याची मनीषा मी नेहमीच बाळगली. या कोटाच्या खरेदीने मला ती संधी प्राप्त झाली आहे. हा अविश्वसनीय सूट माझ्याकडे येईल याचा विचार मी कदापि केला नव्हता. असे हिरे व्यापारी लालजी पटेल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)