काश्मीरच्या स्थितीवर चर्चेस मोदी तयार : मुफ्ती
By admin | Published: April 25, 2017 12:47 AM2017-04-25T00:47:42+5:302017-04-25T00:47:48+5:30
खोऱ्यातील चिघळलेली परिस्थिती रोखण्यासाठी संबंधित गटांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारी दाखवली आहे,
नवी दिल्ली : खोऱ्यातील चिघळलेली परिस्थिती रोखण्यासाठी संबंधित गटांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारी दाखवली आहे, असे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी म्हटले; मात्र चर्चेसाठी तसे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदी यांची त्यांच्या येथील निवासस्थानी मुफ्ती यांनी २० मिनिटे भेट घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘‘दगडफेक आणि गोळीबार होत असताना चर्चा घडू शकत नाही.’’ भेटीत मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काश्मीर धोरणाचा उल्लेख केला. वाजपेयी यांच्या धोरणानुसार चर्चा जेथे थांबली होती तेथून ती परत सुरू केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. याचा अर्थ फुटीरवाद्यांशी चर्चा करा अशी त्यांची उघड सूचना आहे.
खोऱ्यातील परिस्थिती सामान्य झाली की चर्चा करण्याचा मोदी यांचा हेतू आहे, असे त्यांनी सांगितले. चर्चा हाच एकमेवर पर्याय आहे. संघर्ष किती लांबवणार, असे मुफ्ती म्हणाल्या. वाजपेयी पंतप्रधान व लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान असताना हुरियत कॉन्फरन्सशी चर्चा झाली होती. ती चर्चा जेथे थांबली होती तेथून ती परत सुरू करण्याची गरज आम्हाला आहे, असे त्यांनी म्हटले.
वाढत्या दगडफेकीबद्दल त्या म्हणाल्या की, काही तरुणांचा भ्रमनिरास झाला असून, काही तरुणांना दगडफेकीसाठी फेसबुक व व्हॉटस्अॅपसारख्या समाजमाध्यमांतून चिथावणी दिली जात आहे.
मुफ्ती यांनी खोऱ्यातील परिस्थिती येत्या दोन ते तीन महिन्यांत सुधारेल व त्यानंतर चर्चेसाठी पुढाकार घेतला जाईल, असे म्हटले. गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन त्यांनी खोऱ्यातील परिस्थितीवर चर्चा केली.
येते दोन ते तीन महिने खूप महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. चर्चा कधी सुरू करायची याचा निर्णय केंद्रातील उच्च पातळीवरील नेते घेतील.