पीएमओमधील १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची मोदींनी केली बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 05:56 AM2020-03-04T05:56:38+5:302020-03-04T05:56:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राबवत असलेल्या नव्या धोरणानुसार पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) वर्ग चारसह १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राबवत असलेल्या नव्या धोरणानुसार पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) वर्ग चारसह १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या अनेक दशकांत प्रथमच असे घडले आहे. पीएमओमध्ये प्रदीर्घ काळापासून कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना बदलून पाठवायचा निर्णय मोदी यांनीच घेतला. साऊथ ब्लॉकमध्ये त्याच विभागात ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी शिपाई, कारकून आणि कनिष्ठ अधिकारी काम करीत असल्याचे नरेंद्र मोदी यांना आढळले ही वस्तुस्थिती आहे. अगदी ठरवून राबवलेल्या या धोरणानुसार मोदी यांनी या ‘जुन्या’ किंवा ‘ज्येष्ठ’ समजल्या जाणाºयांना त्यांच्या मूळ विभागात पाठवायचे व नवे रक्त पीएमओमध्ये आणण्याचा
निर्णय घेतला. पंतप्रधान कार्यालयाला स्वत:चा असा प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाºयांचा कायम स्वरूपाचा गट (केडर) नसल्यामुळे कर्मचारी वर्ग इतर मंत्रालये आणि विभागांतून प्रतिनियुक्तीवर आणावे लागतात. नव्या धोरणाचा भाग म्हणून
मोदी यांनी पीएमओमधून अगदी तळापासून ते कळसापर्यंत असलेला प्रत्येकाला त्याचे पद काहीही असलेतरी एकदा त्याच्या प्रतिनियुक्तीची मुदत संपली की, बाहेर पाठवायचेच, असा निर्णय घेतला. पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांनी हे नवे धोरण मोदी यांच्याच सांगण्यावरून तयार केले असून, ते आता राबवले जात आहे, असे समजते. अधिकारी सात वर्षांपेक्षा (पहिली पाच वर्षे आणि मुदतवाढ मिळालेले आणखी दोन वर्षे धरून) जास्त काळ एका जागेवर राहायला
नको, ही मोदी यांची भूमिका आहे.