‘नमामि गंगे’अभियानाच्या पोस्टरवरील मोदी-शहा यांची छायाचित्रे हटविली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 06:45 AM2021-06-10T06:45:18+5:302021-06-10T06:46:09+5:30
Modi-Shah : उत्तर प्रदेश सरकारने या पोस्टरवरून मोदी आणि शहा यांची छायाचित्रे हटविण्याची ही पहिलीची वेळ आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने नव्याने जारी केलेल्या ‘नमामि गंगे’ अभियानाच्या पोस्टरवर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची छायाचित्रे नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्य योगी आदित्यनाथ यांच्यात सुरू झालेले शीतयुद्ध थांबविण्याची चिन्हे दिसत नसल्याचे संकेत मिळतात. उत्तर प्रदेश सरकारने या पोस्टरवरून मोदी आणि शहा यांची छायाचित्रे हटविण्याची ही पहिलीची वेळ आहे.
आपसातील शीतयुद्धामुळे योगी आदित्यनाथ यांनी हे पाऊल उचलले असावे, असे मानले जात आहे. तथापि, मोदी आणि शहा यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीत ब्राह्मण समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. योगी यांचे महत्त्व कमी करण्यासाठी पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे सूत्रांनी सांगितले. योगी आदित्यनाथ राज्यात ठाकूर समुदायाला महत्त्व देत ब्राह्मण समाजाची उपेक्षा करीत आहे, असा त्यांच्यावर आरोप आहे.
त्यामुळे पंतप्रधान मोदी ब्राह्मण समाजाला भाजपसोबत जोडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ए.के. शर्मा यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न केला; आता जितीन प्रसाद यांना भाजपमध्ये सामील करून ब्राह्मण समाजाला आकर्षित केले जात आहे. योगी आदित्यनाथ यांनीही हा डाव ओळखून आपली प्रतिमा सुधारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. नमामि गंगे अभियानाचे नवीन पोस्टर, त्यांच्या या प्रयत्नांचाच एक भाग आहे.