मोदींनी हात झटकले!

By admin | Published: October 15, 2015 03:14 AM2015-10-15T03:14:41+5:302015-10-15T03:14:41+5:30

गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरी येथे एका मुस्लीम व्यक्तीस जिवंत जाळले जाणे आणि शिवसेनेच्या विरोधामुळे पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द करावा

Modi shook hands! | मोदींनी हात झटकले!

मोदींनी हात झटकले!

Next

नवी दिल्ली : गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून दादरी येथे एका मुस्लीम व्यक्तीस जिवंत जाळले जाणे आणि शिवसेनेच्या विरोधामुळे पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द करावा लागणे यासारख्या घटना दुर्दैवी व अनावश्यक आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले खरे पण त्याचबरोबर या घटनांशी केंद्र सरकारचा काही संबंध नाही, असे सांगत त्यांनी जबाबदारीही झटकली.
एवढेच नव्हे तर अशा घटनांचे राजकीय भांडवल करून विरोधी पक्षच देशात सांप्रदायिक ध्रुवीकरण करीत असल्याचा आरोप त्यांनी केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली. मोदींना ‘सोयीस्कर स्मृतिभ्रंश’ झाला आहे, असा टोला लगावत काँग्रेसने ‘अशा वेळी अभिनिवेशाची नव्हे तर ठोस कृतीची गरज असल्याचे’ स्मरण पंतप्रधानांना दिले.
दादरीची घटना घडल्यानंतर सुमारे १० दिवस मौन बाळगलेल्या मोदींनी बिहारमध्ये एका निवडणूक प्रचार सभेत दादरीचा थेट उल्लेख न करता ‘हिंदू आणि मुस्लिमांनी आपसात न झगडता गरिबीच्या विरोधात एकोप्याने लढा द्यावा’, असे सांगून सहिष्णुता, ऐक्य व बंधुभाव हीच खरी बलस्थाने असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यानंतर गेल्या आठवडाभरात देशातील वाढते असहिष्णू वातावरण व त्याबाबत केंद्र सरकारची निष्क्रियता याचा निषेध करत देशभरातील सुमारे दोन डझन साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे तर काहींनी इतर सरकारी पुरस्कार परत केले. या सर्व गदारोळात मोदींनी कोलकात्याच्या ‘आनंद बाजार पत्रिका’ या बंगाली दैनिकाशी बोलताना या विषयावर आजवरचे सर्वात थेट व सविस्तर भाष्य केले. प्राप्त परिस्थितीचे खापर विरोधी पक्षांवर फोडताना मोदी म्हणाले, भाजपाने कधीच अशा घटनांचे समर्थन केले नाही. विरोधी पक्ष जाणूनबुजून आपल्या राजकीय लाभासाठी भाजपाविरुद्ध धर्मांधतेची हवा पसरवीत असून फसवी धर्मनिरपेक्षता आणि धु्रवीकरणाचे राजकारण करीत आहेत.
भूतकाळात सुद्धा अशा मुद्यांवर वादविवाद झाले आहेत. भाजपाने नेहमीच फसव्या धर्मनिरपेक्षतेला विरोध केला आहे. यावर विचारविनिमयातूनही तोडगा निघू शकतो. मात्र अल्पसंख्यकांच्या विकासाशी काहीही देणेघेणे नसलेले आणि त्यांचा केवळ व्होटबँक म्हणून वापर करणारे पक्ष याबाबत अपप्रचार करीत आहेत,असा दावाही मोदी यांनी केला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
जबाबदारी यूपी सरकारची
दादरीसारख्या घटनांना आळा घालणे आणि अशा घटना हाताळणे ही सर्वस्वी राज्य सरकारची जबाबदारी असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, असा पुनरुच्चार केंद्र सरकारने बुधवारी केला.
माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्ली येथे पत्रपरिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची निंदा केली असून भारतीय जनता पार्टीने अध्यक्ष अमित शहा यांनी सुद्धा वक्तव्य केले आहे.

मोदी हे केवळ ‘संघ’रक्षक-शरद यादव
मोदी हे केवळ ‘संघ’रक्षक आहेत. दादरीतील घटनेबाबत आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या भाजपा नेत्यांसह केंद्रीय मंत्र्यांचा बचाव करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. एकाअर्थी त्यांनी आपल्या लोकांना धार्मिक असहिष्णुता वाढविण्याची परवानगी दिली आहे, असा आरोप संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी केला.
———————————-
आधी मारायचे मग क्षमा मागायची-लालूप्रसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडल्याचे समजते. परंतु माझा यावर विश्वास नाही. एखाद्याला आधी मारायचे आणि नंतर क्षमा मागायली यालाच मौन सोडणे म्हणतात काय? मोदी आणि संघ परिवारातील लोक रात्री बोलतात वेगळे आणि सकाळी पुन्हा तसेच वागतात, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली.
——————
पंतप्रधान फार विचारपूर्वक बोलले असून त्यांचे वक्तव्य मला मान्य आहे.
-जीतनराम मांझी, नेते, हिंदुस्तान आवाम मोर्चा
——————————
दादरी घटनेचा थेट संबंध भाजपा आणि संघ परिवाराशी आहे. त्यामुळे सरकारचा या घटनेशी संबंध नाही असे सांगून पंतप्रधान जबाबदारीपासून दूर पळत आहेत. ते या देशाचे पंतप्रधान असून संवैधानिक मूल्ये कायम राखण्यासाठी त्यांना जनादेश मिळाला आहे.
-डी.राजा, खासदार, भाकपा
————————————
——————————-
‘दुर्दैवी’ हा खूपच सौम्य शब्द आहे. देशात जे काही घडते त्याची जबाबदारी देशाचे नेते या नात्याने पंतप्रधानांनी घ्यायला हवी. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे व देशाच्या नेत्याने चार शब्द बोलण्याने खूप फरक पडतो. भाजपाने नेहमीच बेगडी धर्म निरपेक्षतेला विरोध केला आहे, हे मोदींचे म्हणणेही न पटणारे आहे.
-शशि देशपांडे, ज्येष्ठ लेखिका
>>गोध्राचे भूत उकरून शिवसेनेची गुगली
जग नरेंद्र मोदी यांना गोध्रा आणि अहमदाबादेतील जातीय दंगलींमुळे ओळखते. आम्हालासुद्धा त्यामुळेच त्यांचा आदर वाटतो. तेव्हा त्यांनी गुलाम अली आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांच्याशी संबंधित वाद दु:खद असल्याचे वक्तव्य केले असेल तर आमच्यासाठी ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली. मात्र दादरी घटनेविषयी मोदींनी व्यक्त केलेल्या भावनांशी त्यांनी सहमती दर्शविली.
>>दादरीतील जळितकांड व मुंबईतील गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द होणे यासारख्या घटना दुर्दैवी व क्लेषकारी असल्या तरी यासाठी केंद्र सरकारला कसा काय दोष देता येईल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने तो संबंधित राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे, असेही अप्रत्यक्षपणे सुचविले.
>>सध्याच्या परिस्थितीत कुठल्याही दिखाव्याची नाही, तर ठोस कारवाईची गरज आहे, असा टोला लगावत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, आपण या देशाचे पंतप्रधान असून येथील सव्वा कोटी नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी आपली आहे याचाही त्यांना विसर पडला आहे.
जेथे गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द केला गेला व सुधींद्र कुलकर्णींच्या तोंडाला काळे फासले गेले त्या महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आहे, हेही मोदी विसरलेले दिसतात, असा चिमटाही त्यांना काढला.
सांप्रदायिक धुवीकरण आणि पक्षीय राजकारणाचा आरोप विरोधकांवर करणाऱ्या पंतप्रधानांनी त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी महेश शर्मा, संजीव बलियान, भाजपा नेते संगीत सोम, साध्वी प्राची आणि इतर नेत्यांवर काय कारवाई केली हे देशाला सांगावे, अशी मागणीही काँग्रेसने केली.

Web Title: Modi shook hands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.