दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी मोदींनी देशाची माफी मागावी - केजरीवाल
By admin | Published: January 19, 2016 10:46 AM2016-01-19T10:46:27+5:302016-01-19T13:37:18+5:30
रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांची पंतप्रधान मोदींनी हकालपट्टी करून देशाची माफी मागावी अशी मागणी केजरीवाल यांनी केली
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या वसतिगृहात गळफास लावून घेतल्याचे प्रकरण सध्या चांगलेच तापले असून देशभरात या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्याची हकालपट्टी करावी आणि संपूर्ण देशाची माफी मागावी' अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
' त्या दलित मुलाचा मृत्यू ही आत्महत्या नव्हे तर तो लोकशाही, सामाजिक मूल्यं आणि समानतेचा खून आहे. मोदीजींनी याप्रकरणी संबंधित मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे आणि संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे,' असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.
ऑगस्ट २०१५ मध्ये विद्यापीठात ‘मुझफ्फरनगर बाकी है’ या वृत्तचित्र प्रदर्शनावरून दलित विद्यार्थी संघटना आणि अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या गटांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे रोहित आणि अन्य पाच दलित विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते. अभाविपच्या नेत्यावर हल्ला केल्याचा या सर्वांवर आरोप होता. त्या घटनेनंतर तणावाखाली असलेल्या रोहितने अखेर रविवारी गळफास लावून आपले जीवन संपवले. या सर्व प्रकरणामुळे देशातले वातावरण तापले असून रोहितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सायबराबाद पोलिसांनी केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान रोहितच्या आत्महत्येच्या निषेधार्थ पुण्यात एफटीआयआयचे विद्यार्थी एक दिवसाच्या उपोषणास बसले आहेत.
Modi govt constitutionally duty bound to uplift dalits. Instead Modi ji's ministers got five dalit students ostracised n suspended(1/2)
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 19, 2016
It's not suicide. It's murder. It's murder of democracy, social justice n equality.Modi ji shd sack ministers n aplogoize to the nation(2/2)
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 19, 2016