दिल्ली विधानसभेत मणिपूरवरून गोंधळ; 'आप'च्या मोदीविरोधी घोषणेनं भाजपा आमदार खवळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 03:35 PM2023-08-17T15:35:53+5:302023-08-17T15:38:59+5:30
दिल्ली विधानसभेत मणिपूर हिंसाचारावर चर्चेवेळी गोंधळ झाला.
दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मणिपूर हिंसाचारावर चर्चा सुरू होताच सभागृह अचानक 'मोदी तेरे राज में, मणिपूर जल गया आग में'च्या घोषणा सुरू झाल्या. मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होताच आम आदमी पार्टी आणि भाजपच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या विषयावर आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांनी चर्चेला सुरुवात केली. दुर्गेश पाठक म्हणाले की, तुम्ही संसदेतही मणिपूरची चर्चा करत नाही. ते इथे विधानसभेत चर्चाही होऊ देत नाहीत, मग चर्चा करायची कुठे. तुम्ही म्हणता की मणिपूर हा मुद्दा नाही.
सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरून मला अध्यक्षपद मिळाले - मल्लिकार्जुन खर्गे
दिल्ली विधानसभेत मणिपूर हिंसाचारावर चर्चेदरम्यान गदारोळ केल्यामुळे जितेंद्र महाजन यांच्यासह चार आमदारांना सभागृबाहेर काढण्यात आले. मणिपूर हिंसाचारावरील चर्चेला सभागृहात विरोध केल्यामुळे आणि गदारोळ केल्यामुळे या चौघांनाही सभापतींनी बाहेर काढले. आपचे आमदार दुर्गेश पाठक मणिपूरच्या मुद्द्यावर बोलत आहेत. दुसरीकडे, आपचे आमदार मणिपूरमध्ये केंद्राच्या अपयशाविरोधात दिल्ली विधानसभेत घोषणाबाजी करत आहेत.
दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सभागृहाला संबोधित करण्यासाठी दुपारी ४ वाजता येणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीएम केजरीवाल मणिपूर हिंसाचारावरही बोलणार आहेत. दुसरीकडे, भाजपचे सदस्य मणिपूर हिंसाचारावर सभागृहात चर्चेला विरोध करत आहेत.