एनएसजीसाठी पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी मानले ब्राझीलचे आभार
By Admin | Published: October 18, 2016 04:52 AM2016-10-18T04:52:42+5:302016-10-18T04:52:42+5:30
भारताच्या मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मायकेल टेमेर यांचे सोमवारी येथे आभार मानले.
बाणावली (गोवा) : अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्याच्या भारताच्या मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मायकेल टेमेर यांचे सोमवारी येथे आभार मानले.
उभय देशांनी गुंतवणूक सहकार्यासह चार सामंजस्य करारावर सोमवारी स्वाक्षरी केली. त्यानंतर ब्राझिलियन राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त घोषणापत्र जारी करताना मोदी बोलत होते. एनएसजीचा भाग होण्याची भारताची आकांक्षा समजून घेतल्याबद्दल ब्राझीलला धन्यवाद देतो, असे ते म्हणाले. भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईला पाठिंबा दिल्याबद्दलही मोदींनी त्यांचे आभार मानले. प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या निवेदनात मोदींनी म्हटले की, ब्राझील हा भारताचा लॅटिन अमेरिकेतील सर्वात महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. भारत आणि ब्राझीलमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत झाले असून, सर्व स्तरांवर आमचा संवादही वाढला आहे. मी ब्राझिलियन कंपन्यांचे स्वागत करतो. त्यांनी येथे येऊन गुंतवणूक करावी.
सेऊल येथे जूनमध्ये झालेल्या एनएसजीच्या बैठकीत भारताच्या एनएसजीतील प्रवेशाला ब्राझीलने विरोध केला नव्हता. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशांना समान निकषांच्या आधारे संघटनेत स्थान दिले जावे, अशी भूमिका ब्राझीलने मांडली होती, हे विशेष. (प्रतिनिधी)