रामजन्मभूमी निकालानंतर संयम बाळगल्याबद्दल मोदींनी जनतेचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 04:52 AM2019-11-25T04:52:45+5:302019-11-25T04:54:43+5:30
रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संयम बाळगून परिपक्व वृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल देशातील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.
नवी दिल्ली : रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संयम बाळगून परिपक्व वृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल देशातील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. भारतीयांना देशहित सर्वात महत्त्वाचे वाटते, हे त्यातून दिसून आले, असेही ते म्हणाले.
‘मन की बात’ या कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. मोदी यांनी सांगितले की, रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. त्यामुळे आता नव्या मार्गाने देशाची वाटचाल सुरू झाली आहे. देशामध्ये शांतता, सलोखा टिकून राहावा, अशी जनतेची इच्छा आहे. हा निकाल देशातल्या न्याययंत्रणेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे.
रामजन्मभूमी वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याआधी दिवाळीमध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमात केलेल्या भाषणात मोदी म्हणाले होते की, या वादासंदर्भात २०१० साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशामधील नागरिकांनी शांतता व सलोखा कायम राखला होता. त्याची पुनरावृत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.
‘राजकारणात येण्याची इच्छा नव्हती’
नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, राजकारणात येण्याची मला अजिबात इच्छा नव्हती. मात्र, या क्षेत्रात आल्यानंतर जनतेच्या कल्याणासाठी मी कायमच उत्कृष्ट कामगिरी बजाविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही राजकारणात गेला नसतात, तर कोण झाला असता? असा प्रश्न एका एनसीसी कॅडेटने मोदी यांना ‘मन की बात’ कार्यक्रमात विचारला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. गुगलमुळे सारे संदर्भ चुटकीसरशी मिळत असल्याने आपल्या ग्रंथवाचनाच्या सवयीवर थोडा परिणाम झाला असल्याचेही त्यांनी मान्य केले.