मोदी- थेरेसा चर्चाः गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणावर सहकार्य हवे
By admin | Published: July 8, 2017 07:10 PM2017-07-08T19:10:25+5:302017-07-08T19:10:25+5:30
पंतप्रधान मोदी यांनी भारतातून आर्थिक घोटाळे करुन गेलेल्या गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी सहकार्य करावे अशी मागणी इंग्लडकडे केली.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
हॅम्बर्ग, दि.8- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी जी 20 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळेस पंतप्रधान मोदी यांनी भारतातून आर्थिक घोटाळे करुन गेलेल्या गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी सहकार्य करावे अशी मागणी इंग्लडकडे केली.
नेमक्या याच वेळेस इंग्लडमध्ये भारतातील विविध बॅंकांचे हजारो कोटींचे कर्ज थकवून पळालेल्या विजय माल्यावर वेस्टमिनिस्टर कोर्टात खटला चालू आहे. माल्याला सध्या 4 डिसेंबर पर्यंत सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. विजय माल्याने 2016 साली मार्च महिन्यामध्ये हर्टफोर्डशायर येथे पलायन केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि थेरेसा मे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. या भेटीबद्दल भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 1992 साली प्रत्यार्पण करार करण्यात आला होता. मात्र आजवर केवळ समीरभाई विनुभाई पटेल या एकमेव आरोपीचे प्रत्यार्पण झालेले आहे. 2002 साली गोध्रानंतर झालेल्या दंगलीत सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याला पुन्हा भारतात पाठवले.
नरेंद्र मोदी- डोनल्ड ट्रम्प भेट
जी 20 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी स्वतः पुढे जाऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी घेतलेल्या उत्स्फुर्त भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचेही समजते. नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ अरविंद पानगढिया यांनी या भेटीचे काही क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करुन ट्वीट केले आहे. त्यानंतर ही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.
जी 20 परिषदेत दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरु होण्यापुर्वी या दोन्ही नेत्यांनी उत्स्फुर्त संवाद साधला असे पानगगढिया यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. दोन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय चर्चांसोबत विविध देशांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत त्याचप्रमाणे जर्मनीच्या चॅन्सलर अॅंजेला मर्केल आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांची त्यांनी भेट घेतली. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो आणि अॅंजेला मर्केल यांच्याबरोबर अनौपचारिक चर्चा करत असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते.