प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 06:38 AM2024-05-10T06:38:52+5:302024-05-10T06:39:05+5:30
३१ मार्च ते ५ मे या तीन टप्प्यांतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक निवडणूक प्रचारसभा घेण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाला आहे.
संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मार्च ते ५ मे या पहिल्या तीन टप्प्यांत ८३ प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत. १४ मे रोजी वाराणसीमध्ये उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी १३ मे रोजी विशाल 'रोड शो' करणार आहेत.
३१ मार्च ते ५ मे या तीन टप्प्यांतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक निवडणूक प्रचारसभा घेण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाला आहे. ८३ निवडणूक सभा घेऊन पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षातील सर्व नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना खूप मागे टाकले आहे. या काळात पंतप्रधान मोदींनी १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८३ निवडणूक सभा आणि 'रोड शो'मध्ये भाग घेतला आहे.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह ६६ निवडणूक सभा आणि 'रोड शो' सह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ४० निवडणूक - सभांना संबोधित केले, तर प्रियांका गांधी यांनी २९ निवडणूक सभांना संबोधित केले.
आता निवडणुकीच्या प्रचाराच्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाला निवडणूक सभांपेक्षा 'रोड शो' करण्याचे निर्देश दिले आहेत. १४ मे रोजी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मे रोजी वाराणसीमध्ये विशाल रोड शो' करणार आहेत. मोदी यांच्या रोड शोपूर्वीच्या सर्व तयारींचा आढावा घेण्यात येत आहे.
यंदा सर्वाधिक प्रचारसभा, 'रोड शो' करणारे नेते...
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८३
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 33
काँग्रेस नेते राहुल गांधी ४०
प्रियांका गांधी २९
सर्व नेते वाराणसीत येणार मोदी यांच्या उमेदवारीसाठी २५ ते ३० समर्थकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध जाती, जमातींचे लोक आहेत. यांना समर्थक बनवून मोदी हे कोणत्याही एका जाती-धर्माचे नसून त्यांना सर्व जाती-धर्माचा पाठिंबा मिळत आहे, असा संदेश दिला जाणार आहे. पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान भाजप आणि एनडीएचे सर्व वरिष्ठ नेते वाराणसीला पोहोचण्याची शक्यता आहे.