प. बंगालमध्ये मोदी विरुद्ध दीदी; डाव्यांनीही कसली कंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:30 AM2019-02-12T01:30:52+5:302019-02-12T01:31:23+5:30
एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. उत्तरप्रदेश व महाराष्ट्रानंतर सर्वाधिक ४२ जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत.
- योगेश पांडे
एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. उत्तरप्रदेश व महाराष्ट्रानंतर सर्वाधिक ४२ जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत. बंगालचे महत्त्व लक्षात घेऊन तृणमूल, डावे व काँग्रेससह भाजपानेही कंबर कसली आहे. त्यामुळे अनेक जागी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. मात्र बंगालमध्ये तृणमूलसमोर आव्हान भाजपाचेच राहण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ममता बॅनर्जी यांनी खुले आव्हान दिले असल्याने निवडणुकांचा संग्राम चांगलाच तापणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाट असतानाही राज्यातील ४२ जागांपैकी ३४ जागांवर तृणमूल काँग्रेसने विजय मिळविला होता, तर दोनच जागांवरच भाजपाला यश मिळाले होते. काँग्रेसला चार तर सीपीआय (एम)ला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र २०१६ च्या विधानसभा निवडणुकांत भाजपाच्या मतांमध्ये जवळपास ६.१० टक्क्यांनी वाढ तर झाली. तरीही तृणमूलने २९४ पैकी २११ जागा खिशात टाकत एकहाती सत्ता मिळविली. केंद्रात सत्ता येताच मोदींनी शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपविली आणि ‘मोदी विरुद्ध दीदी’ हा वाद पेटला. याच मुद्द्यावर सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस वादात ममतांनी मोदी सरकारवर केलेल्या आंदोलनामुळे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले.
बंगालमध्ये निवडणुकांचा केंद्रबिंदू या ममता बॅनर्जीच राहणार आहेत. जानेवारीमध्ये भाजपाविरोधात २३ विरोधी पक्षांनी मोट बांधली व महाआघाडीची रॅली दिल्लीतील सत्ताधाºयांना धडकी भरविणारी ठरली. या महाआघाडीच्या नेत्या म्हणून ममता बॅनर्जी यांचेच नाव घेण्यात येत होते. मागील दोन निवडणुकांपासून तृणमूलने राज्यात वर्चस्व कायम ठेवले आहे. बंगालमधील मुर्शीदाबाद, मालदा यासह मुस्लीमबहुल तसेच ग्रामीण भागात तृणमूलचे वर्चस्व आहे.
मात्र येत्या निवडणुकांत ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान असेल भाजपाचे. उत्तरेकडील राज्यांत भाजपाच्या जागा घटण्याचे अंदाज आहेत. त्यामुळेच बंगालमधून अतिरिक्त २० जागा मिळविण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पण भाजपाने २०१८ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड जोर लावूनही तृणमूलच सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र भाजपानं काँग्रेस आणि डाव्यांना मागे टाकलं.
त्यामुळे भाजपा आता मिशन-२३ घेऊन उतरत आहे. बांग्लादेशी घुसखोर, भ्रष्टाचार व नागरिकत्व विधेयक यावर भाजपाचा भर राहील. नागरिकत्व विधेयकात बांग्लादेशातून शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, इसाई, पारसी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळावे, अशी तरतूद आहे. राममंदिर, बंगालमधील हिंदुंवरील कथित हल्ले, धर्मांतराचे प्रकार यावर भाजपा जोर देईल.
एकेकाळी बंगालवर वर्चस्व गाजविलेल्या डाव्यांनी मतदारांना परत खेचण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामीण व आदिवासी भागांत डाव्यांचे प्रचारतंत्र मजबूत आहे. तृणमूलच्या धोरणांमुळे नाराज
मतदार डाव्या पक्षांकडे परतण्याची शक्यता आहे. मार्क्सवाद्यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून डाव्यांचा उत्साह वाढला आहे.
काँग्रेससमोर अडचण
काँग्रेससाठी ही लढाई अस्तित्वाची ठरणार आहे. बंगालमधील काँग्रेसच्या मतांची टक्केवारी व जागांचे प्रमाण हे सातत्याने कमी होत आहे. त्यातच मालदा येथील खासदार मौसम नूर व १४ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यात पक्षाकडे एकही आश्वासक चेहरा नसल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरच काँग्रेसची भिस्त राहणार आहे.