'मोदी vs योगी' पोस्टर्सचा वाद रंगला, युपी पोलिसांकडून तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:08 AM2018-12-13T11:08:36+5:302018-12-13T11:09:53+5:30
उत्तर प्रदेशमधील वादग्रस्त पोस्टर्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. येथील उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या संघटनेने ही पोस्टरबाजी केल्याचे समजते.
लखनौ - देशातील पाच राज्यांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् अमित शहा यांनाच या पराभवासाठी जबाबदार धरले जाऊ लागले आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये चक्क मोदी vs योगी अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. योगी लाओ-देश बचाओ असे पोर्स्टर्स उत्तर प्रदेशमध्ये झळकले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटकही करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील वादग्रस्त पोस्टर्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. येथील उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या संघटनेने ही पोस्टरबाजी केल्याचे समजते. अमित जानी असे या संघटनाप्रमुखाचे नाव असून त्यांचाच यामागे हात असल्याची माहिती आहे. अमित जानी हे सपा नेते शिवपाल यादव यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. युपीमध्ये झळलेल्या या पोस्टर्समध्ये एका बाजुला पंतप्रधान मोदी तर दुसऱ्या बाजुला मुख्यमंत्री योगी दिसून येत आहेत. तर मोदींच्या फोटोखाली 'जुमलेबाजी का नाम मोदी' असे लिहिले असून योगींच्या फोटोखाली 'हिंदुत्व का ब्रांड योगी' असे लिहिण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यातील 10 तारखेला होणाऱ्या धर्म संसद कार्यक्रमाची पत्रिका म्हणून हे डिजीटल फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या वादग्रस्त फलकामुळे उत्तर प्रदेश भाजपामध्ये वाद उफाळला असून पोलिसांनी ही पोस्टर्स खाली उतरवली आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून हे फलक प्रिंट करणाऱ्यासही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उन्नाव येथून सुमित पासी, बहरीच येथून इक्रमुद्दीन आणि लखनौ येथून मनिष अग्रवाल यांनी पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, या पोस्टर्संचा मुद्दा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अमित जानी यांनी एका व्हिडीओद्वारे हे पोस्टर्स बरोबर असल्याचं म्हटलंय. तर, या पाच राज्यांत योगी आदित्यनाथ यांनी प्रचार केला नसता, तर भाजपाची स्थिती आणखीनच खराब राहिली असती, असे या जानी यांनी म्हटलंय.