'केवळ मोदी लाटेच्या भरवशावर राहू नका; निवडणुका जिंकणं अवघड होईल'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:42 PM2021-09-20T14:42:24+5:302021-09-20T14:48:09+5:30
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते येडियुरप्पांचं विधान
देवानागेरे: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव वापरून निवडणूक जिंकता येणार नाही. लोकसभा निवडणूक जिंकणं सोपं आहे. पण राज्यात निवडणूक जिंकणं कठीण आहे, असं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.
केवळ मोदी लाटेच्या जीवावर कर्नाटकमध्ये निवडणुका जिंकू शकत नाही. लोकसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी असते आणि राज्यातल्या निवडणुकांमधली स्थिती वेगळी आहे. आपण केवळ मोदी लाटेवर अवलंबून राहू शकत नाही. आपण विकासकामं घेऊन लोकापर्यंत जायला हवं, असं येडियुरप्पा म्हणाले. पक्षाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. हंगल आणि सिंदगी पोटनिवडणुका पक्षासाठी लिटमस टेस्ट असतील, असं येडियुरप्पा यांनी सांगितलं.
'पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यात काय संदेश जाईल त्याची आपल्याला कल्पना आहे. या निवडणुका जिंकणं सोप्या जातील असं समजू नका. विरोधक सक्षम आहेत. त्यांची काही गणितं आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं,' असं येडियुरप्पा म्हणाले.
'आगामी लोकसभा निवडणुकीनंतरही केंद्रात भाजपचीच सत्ता राहील यात तिळमात्र शंका नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली आपण विजयी होऊ. पण प्रत्येक निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी आपण पक्षाला मजबूत करायला हवं. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन आपण बूथ स्तरावर तरुण आणि महिलांच्या टीम तयार करायला हव्यात,' असं येडियुरप्पा म्हणाले.