मोदी वाराणसीसह बडोद्यातून लढणार?; भाजपचा तर्क-वितर्कांना विराम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 06:08 AM2019-01-03T06:08:01+5:302019-01-03T06:10:01+5:30
वाराणसीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेची आगामी निवडणूक ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लढविणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असताना भाजपने हा बेत रद्द केला आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : वाराणसीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेची आगामी निवडणूक ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लढविणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असताना भाजपने हा बेत रद्द केला आहे. लोकसभेच्या २१ जागा असलेल्या किनारपट्टीवरील राज्य जिंकण्याच्या रणनीतीतहत मोदी हे पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असा तर्क लावला जात होता. तथापि, वाराणसीसोबत गुजरातमधूनही निवडणूक लढविण्याचा त्यांचा विचार आहे.
काल मंगळवारी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पुरीमधून लोकसभेची निवडणूक लढविणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तथापि, मोदी यांनी या प्रश्नाला स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले होते. भाजपच्या सूत्रांनी ही योजना रद्द करण्यात आल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. पाच राज्यांत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा बेत बारगळला आहे.
सूत्रानुसार वाराणसीसोबत दुसऱ्या लोकसभा मतदारसंघातून मोदी निवडणूक लढविणार असतील तर निश्चित गुजरातमधील बडोदा मतदारसंघातून निवडणूक लढवितील. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ही जागा सोडली होती. नंतर पोटनिवडणुकीत रंजनबेन भट्ट येथून निवडून आल्या होत्या.
तथापि, गांधीनगरमधून निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या भाजपचे ज्येष्ठ लालकृष्ण अडवाणी करतात. अडवाणी यांना लोकसभेचे तिकीट नाकारले जाऊ नये, अशी मोदी यांची इच्छा आहे. अडवाणींना तिकीट नाकारल्यास हा भावनात्मक मुद्या होऊ शकतो. अशा स्थितीत काय तोडगा काढता येईल, यासाठी मध्यस्थ काम करीत आहेत.
मोदी यांनी पुन्हा गुजरातमधून लोकसभेची निवडणूक लढविल्यास लोकसभेच्या सर्व २६ जागा भाजप आपल्याकडे राखू शकते, असे मत भाजप नेतृत्वाने मोदी यांच्याकडे व्यक्त केले आहे.
लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मोदी यांचा बेत नाही, असे स्पष्ट संकेत भाजपच्या श्रेष्ठींनी नवीन पटनायक यांंना दिल्याचे समजते. बिजू जनता दल काँग्रेसशी दोन हात दूर ठेवून असेपर्यंत बिजद सरकारसोबत भाजपला समस्या नाही.
बिजदचा सशर्त प्रतिसाद
भाजपच्या संकेताला बिजदने सशर्त सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. माजी खासदार बी. जे. पांडा यांच्यासारख्या बंडखोरांची पाठराखण केली जाऊ नये, तसेच बिजद नेत्यांना सीबीआय आणि ईडीमार्फत खोट्या गुन्ह्यांत गोवून त्रास देऊ नये.
दिल्लीच्या राजकारणात आम्हाला स्वारस्य नाही. दिल्लीने पूर्वेकडे नजरही टाकू नये, असे नवीन पटनायक यांनी म्हटले आहे. त्यामुळेच शारदा चिटफंडसह विविध घोटाळ्यांबाबत सीबीआय बिजद मंत्री आणि आमदारांविरुद्ध सबुरी राखून आहे.