मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 06:03 AM2024-05-11T06:03:40+5:302024-05-11T06:03:54+5:30
उत्तर प्रदेशकडे मोर्चा वळविणार : १ जूनला केदारनाथच्या दर्शनाला जाणार
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश, बिहारसारख्या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये आपली सर्व ताकद लावणार आहेत. या ठिकाणी लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यासोबतच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये अधिक वेळ देण्याची योजनाही आखण्यात आली आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी झाल्यानंतर दक्षिण भारतातील दोन प्रमुख राज्यांमध्ये आंध्र प्रदेशातील सर्व २५ जागांवर आणि तेलंगणातील सर्व १७ जागांवर मतदान पूर्ण होईल. केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकमधील मतदान पूर्ण झाले आहे. संपूर्ण दक्षिण भारतात १३ मे रोजी मतदान पूर्ण झालेले असेल.
मोदी शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी म्हणजे १ जून रोजी केदारनाथला जाऊ शकतात. प्रत्येक वेळी केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या दिवशी मोदी केदारनाथला जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकांमुळे ते जाऊ शकले नाहीत.
उत्तरप्रदेश, बिहारवर लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मतदानाच्या उर्वरित तीन टप्प्यांसाठी हिंदी पट्ट्यात म्हणजे उत्तर प्रदेश
आणि बिहारमध्ये आपली सर्व शक्ती लावणार आहेत.
विशेष म्हणजे भाजपने ३७० जागा जिंकण्याची घोषणा केली असून, एनडीएसोबत ४०० च्या पुढे जाण्याचा नारा दिला आहे.
या मोठ्या विजयाची संपूर्ण जबाबदारी आता उत्तर प्रदेशसारख्या राज्यावर आहे. या राज्यात लोकसभेच्या ८० जागा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उत्तरप्रदेशातील वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.