पाक व चीनवर वचक ठेवण्यासाठी मोदी इस्रायलकडून घेणार 8 हजार मिसाइल्स
By Admin | Published: April 13, 2017 05:27 PM2017-04-13T17:27:50+5:302017-04-13T17:28:08+5:30
पाकिस्तान आणि चीन हे देश कायमच भारताविरोधात भूमिका घेत असतात.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - पाकिस्तान आणि चीन हे देश कायमच भारताविरोधात भूमिका घेत असतात. भारताच्या सीमावर्ती भागात या देशांच्या उचापती सुरू असतात. त्यामुळेच चीन आणि पाकिस्तानवर वचक ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा मित्र राष्ट्र असलेल्या इस्रायलकडून 8 हजार मिसाइल्स घेणार आहे. त्यासाठी जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौ-यावर जाणार आहे. भारत आणि इस्रायलमध्ये यासाठी करार होणार असून, भारताला पहिल्या खेपेस येत्या दोन वर्षांमध्ये 1.5 अब्ज डॉलरच्या 8 हजार मिसाइल्स मिळणार आहेत.
2025पर्यंत भारतीय लष्कराचं अत्याधुनिकीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलशी 250 अब्ज डॉलरचा करारही करणार आहेत. चीन आणि पाकिस्तानकडून सीमेवर वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणावर जोर दिला आहे. विशेष म्हणजे भारताचा खरा मित्र असलेला इस्रायल या देशाचे पंतप्रधानही मोदींची आतुरतेनं वाट पाहत आहेत. इस्रायलच्या पंतप्रधानांनी ट्विट करून मोदींची वाट पाहत असल्याचं जाहीर केलं आहे. "तुझी वाट पाहतोय मित्रा !, अशा आशयाचं इस्रायली पंतप्रधानांनी ट्विट केलं आहे.
तत्पूर्वी ऑक्टोबर 2014मध्ये इस्रायलकडून स्पाइक मिसाइल खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. या वर्षी 3 एप्रिल रोजीही एक बैठक झाली होती. त्यातही बराक 8 मिसाइल खरेदी करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. मात्र संरक्षण मंत्रालयानं याची वाच्यता करण्यास नकार दिला होता. 2016-17च्या आर्थिक वर्षात इस्रायल हा जगातला तिसरा आण्विक शस्त्रास्त्र पुरवठा देश आहे. त्याप्रमाणे इस्रायलनं सर्वाधिक शस्त्रास्त्र भारताला निर्यात केली आहेत. तसेच या वर्षी भारताची इस्रायलसोबत 10 करार झाले आहेत. आतापर्यंत अमेरिका आणि रशियासोबत भारतानं महागडी शस्त्रास्त्र विकत घेतली आहेत. मात्र लवकरच या यादीत इस्रायलचंही नाव येणार आहे.