2019 मधील लोकसभा निवडणुकीतही मोदीलाट कायम - अमेरिकी तज्ज्ञ
By admin | Published: March 14, 2017 11:15 AM2017-03-14T11:15:08+5:302017-03-14T12:08:44+5:30
देशात सध्या असलेली मोदी लाट 2019 मधील लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहणार, असं भाकीत वर्तवण्यात आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - देशात सध्या असलेली मोदी लाट 2019 मधील लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहणार, असं भाकीत वर्तवण्यात आले आहे. हे भाकीत चक्क अमेरिकेतील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 2019मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती असणार, असे मत अमेरिकेतील तज्ज्ञांनी मांडलं आहे.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या शानदार विजयानंतर अमेरिकेतील तज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2019 लोकसभा निवडणुकीतही सर्वाधिक पसंती असणार शिवाय 2019 नंतरही भारतात मोदींचं नेतृत्व कायम राहील, असे अमेरिकेतील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे प्राध्यापक अॅड झिगफिल्ड यांच्या मते, 'भारतात 2019 मध्येही बदलाचे संकेत दिसत नसल्याचे, विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे'. शिवाय, 2014मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदींचा झालेला विजय हा सामान्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 'भाजपासाठी हा फार मोठा विजय आहे. उत्तर प्रदेशात आधी सत्ता अनुभवलेल्या बसपा आणि समाजवादी पार्टीच्या उमेदवारांच्या तुलनेत भाजपाचे उमदेवार मोठ्या फरकारने विजयी झाले आहेत', असेही ते म्हणालेत
तर, 'या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे पंतप्रधान मोदी आगामी लोकसभा निवडणुकीतील स्पष्ट विजेता दिसत असून 2019 मधील स्पर्धेत ते सर्वांत पुढे आहेत', असे अमेरिकन एंटरप्राईज इंस्टिट्यूच्या सदानंद धुमे यांनी सांगितले आहे. निवडणुकांदरम्यान उत्तर प्रदेशात हजर असलेल्या धुमे यांनी स्थानिकांसोबत झालेल्या संवादाचा हवाला देत सांगितले की, नोटाबंदी हा विषय सर्वाधिक लोकप्रिय आहे. या भ्रष्टाचारला कंटाळालेल्या सर्वसामान्यांनी नोटाबंदी निर्णयाला पाठिंबा दिला.
तर दुसरीकेड, वॉल्श स्कूल ऑफ फॉरेन सर्विसचे प्रोफेसर इरफान नुरूद्दीन यांनी सांगितले की 2019 साली भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी असून मोदी युतीचे सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील. तसंच विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपाची लाट परतवण्यात यश येऊ शकते. मात्र विरोधक तसे करताना दिसत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.