गुजरातेत मोदींच्या ५० सभा; हार्दिकचा काँग्रेसला पाठिंबा, काँग्रेसमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 06:33 AM2017-10-28T06:33:09+5:302017-10-28T06:33:14+5:30
गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपाकडे एकही फर्डा वक्ता वा लोकप्रिय नेता असल्याने, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचाच फायदा उठविण्याचे भाजपाने ठरविले आहे.
गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपाकडे एकही फर्डा वक्ता वा लोकप्रिय नेता असल्याने, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचाच फायदा उठविण्याचे भाजपाने ठरविले आहे. मोदी यांनीही गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, ते राज्यात ५0 ते ७0 जाहीर सभा घेणार आहेत.
या वर्षी काँग्रेस व राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जोर लावला आहे. तेथील लोकांमध्ये असलेले सरकारविरोधी वातावरण व नाराजी यांचा फायदा उठविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र, ते यशस्वी होऊ नयेत, यासाठी स्वत: मोदीच गुजरातमध्ये सभा घेत फिरणार आहेत. या सभा दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, कच्छ आणि मध्य गुजरातेत होतील. मोदी यांनी या महिन्यात तीनदा तर वर्षभरात १0 वेळा गुजरातचा दौरा केला. भाजपा आणि मोदी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचेच हे संकेत आहेत. (वृत्तसंस्था)
>पटेल आरक्षण समितीचा नेता हार्दिक पटेल २ वा ३ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भेट घेणार असून, त्यानंतर ते अधिकृतपणे काँग्रेसला पाठिंबा जाहीर करतील, असे सांगण्यात आले. ते तसेच नरेंद्र पटेल, जिग्नेश मेवाणी, निखिल वसाणी हे नेते काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी सभा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.
>डिजिटल मीडिया आणि रोड शो
भाजपाने मोदी यांना मोठ्या आणि मध्यम आकाराच्या किमान ५० सभा घेण्याची व अधिकाधिक रोड शोजची विनंती केली आहे. मोदी या निवडणुकीत डिजिटल मीडियाचा वापर करून काही सभांत भाषण करणार असून, तरुण व महिला मतदारांसाठी सोशल मीडिया टाउन हॉल्सचे आयोजन केले जाणार आहे.