मोदींच्या अग्निपथ योजनेवरून वातावरण तापले; तरुणांकडून दगडफेक, रेल्वे रोखल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:45 PM2022-06-15T12:45:55+5:302022-06-15T12:51:13+5:30
बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये केंद्राच्या या योजनेविरोधात वातावरण तापले आहे. या योजनेविरोधात संतप्त झालेल्या तरुणांनी बिहारच्या बक्सरमध्ये ट्रेनवर दगडफेक केली आहे.
सैन्य दलांचा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काल अग्निपथ योजना जाहीर केली. याद्वारे ५० हजारावर तरुणांची सैन्य दलात चार वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. तसेच त्यांना पाच ते सात लाखांचे पॅकेज दिले जाणार आहे. चार वर्षांनी ७५ टक्के तरुणांना काढून टाकण्यात येणार असून या साऱ्या सैन्य भरतीच्या नियमांवरून आज मोठा विरोध झाला आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये केंद्राच्या या योजनेविरोधात वातावरण तापले आहे. या योजनेविरोधात संतप्त झालेल्या तरुणांनी बिहारच्या बक्सरमध्ये ट्रेनवर दगडफेक केली आहे. तर मुजफ्फरपुरमध्ये देखील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी या उमेदवारांनी चक्काजाम केले आहे.
अग्निपथ योजनेची घोषणा! सैन्यात 4 वर्षे नोकरी, 6.9 लाखांचे पॅकेज; नंतर सेवा निधी
मोठ्या संख्येने सकाळी ९ वाजता तरुण बक्सर रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते, तिथे त्यांनी रेल्वे ट्रँकवर उतरून गोंधळ घातला. यानंतर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत ते रुळांवरच बसले. यामुळे जन शताब्दी एक्सप्रेस तासाभरासाठी रोखून ठेवण्यात आली होती. यावेळी पाटन्याला जात असलेल्या पाटलिपूत्र एक्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. आरपीएफने रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र, तरी देखील उमेदवार तिथून हटण्याचे नाव घेत नाहीएत.
चार वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ टक्के अग्नीवीरांना काढून टाकले जाणार मग दहावी, बारावी झालेल्या या तरुणांना पुढे काय पर्याय राहील, असा सवाल उपस्थित केला जात आहे. भलेही सरकार त्यांना चार वर्षांनी १२ लाख रुपये देणार, पण त्यांना दुसरी नोकरी देण्यासाठी काय योजना आहे, यावरून सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.