मोदींची उत्तर कोरियाच्या हुकूमशहाशी तुलना, २३ व्यापाऱ्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 05:25 PM2017-10-15T17:25:35+5:302017-10-15T17:26:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनशी करणे उत्तर प्रदेशच्या व्यापाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे.
लखनऊ : व्यापाऱ्यांनी मोदींची किमशी तुलना करणारे बॅनर आणि होर्डिंग्ज संपूर्ण कानपूर शहरात लावले होते. बँकेकडून १० रूपयांची नाणे स्वीकारण्यात येत नसल्याचा आरोप करत याचा विरोध दर्शवण्यासाठी १२ ऑक्टोबरला हे पोस्टर लावण्यात आले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, या होर्डिंग्जवर एका बाजूला हुकूमशहा किमचा फोटो लावण्यात आला आहे. कानपूरमधील २३ व्यापाऱ्यांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
त्याखाली, मी संपूर्ण जगाला संपवून टाकेन अशी ओळ आहे. दुसऱ्या बाजूला मोदींचा फोटो लावण्यात आला असून, त्याखाली मी व्यापाऱ्यांना संपवून टाकेन अशी ओळ लिहिली आहे.हा प्रकार समोर येताच पोलिसांनी विविध कलमे व उत्तर प्रदेश विशेष अधिकारानुसार या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटकही केली आहे. एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव प्रवीणकुमार आहे. पोलीस अधीक्षक अशोक वर्मा यांनी अटकेच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. मोदींचे हे वादग्रस्त पोस्टर लावताना प्रवीणकुमारला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, दुसरीकडे पोलिसांकडून व्यापाऱ्यांवर करण्यात आलेल्या या कारवाईचा इतर व्यापारी विरोध करत आहेत. यावेळी दिवाळी साजरा करणार नसल्याचे या व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, बँक आणि दुकानदार १० रूपयांचे नाणे घेत नाहीयेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना नाईलाजाने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार हे नाणे देऊनच करावा लागत आहे. बँका नाण्यांच्या बदल्यात नोटा देण्यासाठी २५ टक्के रक्कम कापत असल्याचा आरोप या व्यापाऱ्यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर चर्चा झाली होती. परंतु, यावर काहीच तोडगा न निघाल्याने नाईलाजाने व्यापाऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.