मोदींची मनोवृत्ती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय, काँग्रेसचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 04:57 AM2018-07-16T04:57:35+5:302018-07-16T04:57:42+5:30
तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या विधेयकास विरोध करणारी काँग्रेस हा अजूनही १८ व्या शतकातील मानसिकतेचा फक्त मुस्लिम पुरुषांचा पक्ष आहे, या वक्तव्यावरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी जोरदार हल्ला चढविला.
नवी दिल्ली : तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या विधेयकास विरोध करणारी काँग्रेस हा अजूनही १८ व्या शतकातील मानसिकतेचा फक्त मुस्लिम पुरुषांचा पक्ष आहे, या वक्तव्यावरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी जोरदार हल्ला चढविला. पंतप्रधानांची सडकी मनोवृत्ती हा राष्ट्रीय चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि नवा इतिहास लिहिणे बंद करावे, असे काँग्रेसने बजावले.
मोदी यांनी शनिवारी आझमगढ येथील सभेत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले, पंतप्रधानांनी सडक्या मनोवृत्तीने मनाला येईल ते बोलत सुटणे हा राष्ट्रीय चिंतेचा विषय झाला आहे. काँग्रेस हा देशातील प्रत्येक नागरिकाचा व प्रत्येक धर्मावलबीचा पक्ष आहे. काँग्रेसला मोदींकडून प्रशस्तीपत्राची गरज नाही.
शर्मा म्हणाले की, आपण फक्त भाजपाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहोत, ायचे मोदींनी भान ठेवावे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसला मोदींनी मुस्लिमांचा पक्ष म्हणणे हे त्यांच्या पदाला शोभणारे नाही. इतिहासाचे ज्ञान कमी असल्याने मोदी स्वत:चा इतिहास रचत असतात!
महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, लाला लाजपत राय व मौलाना आझाद यासारखे उत्तुंग नेते काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. काँग्रेस अध्यक्षांची यादी मोदींनी आपल्या कार्यालयात लावून ठेवावी, म्हणजे तरी मनाला येईल ते ठोकून देण्याची त्यांची खोड जाईल, असे आसूडही शर्मा यांनी ओढले.
सध्याच्या सरकारच्या वर्षांच्या राजवटीत पाच कोटी लोकांना दारिद्रय रेषेच्या वर आणल्याचा मोदींचा दावा निखालस खोटा आणि हास्यास्पद आहे.उलट नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ची चुकीची अंमलबजावणी यामुळे आणखी काही नवे नागरिक दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. याउलट ‘संपुआ’ सरकारच्या १० वर्षांच्या काळात १४ कोटी लोकांचे वास्तवात दारिद्र्य निर्मूलन केले गेले होते, असा दावाही काँग्रेसने केला.
>कोंडी करण्याची तयारी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या पुढाकारात सोमवारी सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. त्यात बँकांमधील वाढते घोटाळे, महिलांची असुरक्षितता व राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना ठरविण्यात येईल.