मोदींच्या वाढदिवसाला जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक

By Admin | Published: September 16, 2016 01:34 AM2016-09-16T01:34:40+5:302016-09-16T01:34:40+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी एक टनाहून अधिक वजनाचा जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक बनवत जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याची जय्यत तयारी सुरू आहे

Modi's birthday is the world's tallest pyramid cake | मोदींच्या वाढदिवसाला जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक

मोदींच्या वाढदिवसाला जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक

googlenewsNext

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी एक टनाहून अधिक वजनाचा जगातील सर्वात उंच पिरॅमिड केक बनवत जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. प्रशासन, विज्ञान, क्रीडा आणि कलेसह विविध क्षेत्रात भरीव योगदान देत देशाला गौरवान्वित करणाऱ्या देशातील सुकन्यांना सन्मानित करण्यासाठी ‘ एम्पॉवरिंग डॉटर्स : एम्पॉवरिंग इंडिया’ असा अनोखा संदेशही या केकवर कोरला जाणार आहे. विविध क्षेत्रात नाव कमावणाऱ्या मुलींच्या कामगिरीचा उल्लेखही त्यावर असेल.
मोदी १७ सप्टेंबर या वाढदिवशी गुजरात या आपल्या गृहराज्याला भेट देतील तेव्हा सुरत येथे हा केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या जातील. गुजरातची प्रसिद्ध अतुल बेकरी, शक्ती ही स्वयंसेवी संस्था तसेच देशभरात ३० पेक्षा जास्त गिटार केंद्र संचालित करणाऱ्या ‘गिटार मॉन्क’ या संस्थेने मोदींचा अनोखा वाढदिवस साजरा करण्याची तयारी चालविली आहे.

१० हजार मुलींना वाटणार केक...
स्वच्छ भारत आणि मुलींना मोफत पुस्तके पुरविण्यासारख्या सामाजिक कार्यात भूमिका बजावणाऱ्या अतुल बेकरीने हा केक नि:शुल्क तयार करण्याचे काम चालविले आहे. हा केक कापल्यानंतर दिव्यांग, कमकुवत आणि वंचित घटकांमधील सुमारे १० हजार मुलींना वाटला जाणार आहे. विकास आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या हदपाडी आणि कोटवाडियासारख्या अतिमागास समुदायासाठी काम करणाऱ्या शक्ती फाऊंडेशनने या अनोख्या केकला गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. देशभरातील एक हजाराहून अधिक युवा गिटारवादक सुरतमध्ये एकत्र येणार असून ते गिटार मॉन्कच्या नेतृत्वात शांततेचा संदेश देण्यासह मोदींच्या जन्मदिनानिमित्त खास धून वाजवणार आहेत.

आपल्या देशात स्त्रीला शक्ती मानले जाते मात्र कन्या भ्रूणहत्या, हुंड्यासाठी हत्या आणि लिंग असमानतेसंबंधी व्यथित करणाऱ्या घटना घडत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी दिलेला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा संदेश अतिशय प्रासंगिक आहे.
- कपिल श्रीवास्तव, गिटार मॉन्कचे संचालक.


स्वातंत्र्यानंतर एवढी वर्षे उलटूनही आम्हाला भेदभावाचा सामना करावा लागत आहे. आम्हाला पूज्यनीय बनवू नका. आम्हाला आमचा अधिकार आणि समान दर्जा द्या. नव्याने सुरू असलेले प्रयत्न पाहता केवळ कागदावर नव्हे तर वास्तवात महिला लवकरच अधिकारसंपन्न होतील, अशी आशा आहे.
- सरिता मेहता, गिर्यारोहक.

अनेक असमानतांचा मुकाबला करताना आपला धीर न गमावता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलींच्या सन्मानासाठी हे आयोजन असून त्याला मुळीच राजकीय रंग दिला जाऊ नये. देशाचे सोनेरी भविष्य लिहिण्यात त्यांचेही योगदान आहे. - अजित खत्री, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी.

Web Title: Modi's birthday is the world's tallest pyramid cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.