मोदींचा भाजप : एक महाप्रबळ पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 05:13 IST2019-05-26T05:12:50+5:302019-05-26T05:13:04+5:30
मतदारांना राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे वेष्टण लावून विकास योजनांची ‘टॉफी’ खाऊ घालणे ही या लोकसभा निवडणुकीतील भाजपची रणनीती राहिली आहे.

मोदींचा भाजप : एक महाप्रबळ पक्ष
- अभय कुमार दुबे
मतदारांना राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे वेष्टण लावून विकास योजनांची ‘टॉफी’ खाऊ घालणे ही या लोकसभा निवडणुकीतील भाजपची रणनीती राहिली आहे. मतदारांनी ही ‘टॉफी’ नरेंद्र मोदी यांच्या करिश्माई हातांनी खाल्ली आहे, हे या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य. मोदींकडे निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही होते. एक बळकट पक्षसंघटन, अमाप संसाधन, एक सुपरिभाषित नेतृत्व, उत्तम व्यवस्थापन आणि अख्ख्या देशाला ऐकविण्यासाठी एक कहाणी! मोदींसमोर त्यांचे विरोधक प्रत्येकच बाबतीत कमजोर होते. परिणामी जनादेश मोदींच्या पदरात पडला.
या निकालावरून पहिला निष्कर्ष असा काढता येईल की, भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भूतकाळातील काँग्रेसप्रमाणे ‘महाप्रबळ पक्षा’चा दर्जा प्राप्त केला आहे. आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू ही तीन राज्ये वगळता देशाच्या अन्य सर्वच राज्यांमध्ये भाजपची पाळेमुळे खोलवर रुजताना दिसत आहेत. २०१४ मध्ये भाजप पूर्व भारतात कमजोर होता. परंतु या वेळी भाजप दहा राज्यांचे क्षेत्र असलेल्या या भागातही प्रमुख पक्ष बनला आहे. पुढील पाच वर्षांत दक्षिणेतही भाजपचा झेंडा फडकल्याचे दिसले तर त्यात नवल वाटणार नाही.
(राजकीय विश्लेषक)