नोटाबंदीचा मोदींचा धाडसी निर्णय - बिल गेट्सनी मांडली 'मन की बात'
By Admin | Published: November 17, 2016 01:15 PM2016-11-17T13:15:00+5:302016-11-17T13:13:52+5:30
पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच बिल गेट्सनी मात्र हा निर्णय धाडसी असल्याचे सांगत मोदींचे कौतुक केले आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय धाडसी आहे, असे कौतुकोद्गार काढत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल म्हणजे भारताला काळ्या अर्थव्यवस्थेकडून पारदर्शी अर्थव्यवस्थेकडून घेऊन जाणारा महत्ववपूर्ण निर्णय आहे' असे प्रशस्तीपत्रच गेट्स यांनी दिले आहे.
राजधानी दिल्लीत निती आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ट्रान्सफोर्मिंग इंडिया’ या व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना गेट्स यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले.
'पाचशे आणि एक हजारच्या जुन्या नोटा रद्द करुन नव्या नोटा बाजारात आणण्याचा मोदींचा निर्णय धाडसी आहे. नव्या नोटा तयार करताना चोख सुरक्षा उपाययोजना केल्यामुळे अर्थव्यवस्था पारदर्शकक होईल' असे ते म्हणाले. तसेच या निर्णयामुळे डिजिटल व्यवहाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि येत्या काही वर्षांमध्ये भारत हा डिजीटाईज्ड अर्थव्यवस्था असलेला देश बनेल' असा विश्वासही गेट्स यांनी व्यक्त केला.
दरम्यान यावेळी गेट्स यांनी जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचेही स्वागत केले. मात्र ही तर केवळ सुरुवात असून आणखी बरीच सुधारणा करायची आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया आणि आधार कार्ड मोहीमेचेही त्यांनी कौतुक केले. ' ये है मेरे मन की बात' असे सांगत मिश्कील शैलीत गेट्स यांनी भाषणाचा समारोप केला.