मोदींच्या भावाने घेतले रामलल्लाचे दर्शन, शेतकरी आंदोलनाबाबत केले मोठे विधान
By बाळकृष्ण परब | Published: February 5, 2021 06:29 AM2021-02-05T06:29:47+5:302021-02-05T06:30:37+5:30
Pralhad Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काल अचानक अयोध्येत जात रामलल्लांचे दर्शन घेतले.
लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काल अचानक अयोध्येत जात रामलल्लांचे दर्शन घेतले. तसेच हनुमानगढी येथे जात पूजाही केली. यादरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रल्हाद मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. शेतकरी आंदोलनाबाबत काही मध्यममार्ग निघावा, अशी सदबुद्धी आंदोलक शेतकरी आणि मोदी सरकारला देवाने द्यावी, असे प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी गुरुवारी अचानक अयोध्येत येऊन देशातील समस्यांबाबत रामलल्लाच्या दरबारात येऊन प्रार्थना केली. शेतकरी आंदोलनावर तोडगा निघावा आणि कोरोनापासून देशाला मुक्ती मिळावी, यासाठी त्यांनी प्रार्थना केली. दरम्यान, काही दिवसांआधीसुद्धा प्रल्हाद मोदी हे अयोध्येत आले होते. त्यावेळीही त्यांनी राम जन्मभूमीचे दर्शन घेत हनुमानगढी येथे पूजा केली होती.
दरम्यान, पूजा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मी अयोध्येत आलो आहे. सध्या भारतासमोर निर्माण झालेली आव्हाने संपुष्टात येऊदेत. मग कोरोना असो वा शेतकरी आंदोलन समाप्त होऊ दे. शेतकरी आंदोलनावर काही मध्यममार्ग निघावा, अशी सदबुद्धी ईश्वराने आंदोलक शेतकऱ्यांना आणि सरकारला द्यावी.
प्रसारमाध्यमातील काही वृत्तांनुसार आंदोलन करत असलेले लोक शेतकरी नसल्याचे सरकार आणि जनतेला वाटते. तसेच विरोधी पक्षांच्या इशाऱ्यावर काही जण गोंधळ घालत आहेत. दरम्यान, सरकारने अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी बक्षीसांची घोषणाही केली आहे. मात्र प्रल्हाद मोदी यांनी शेतकऱ्यांचे कौतुकही केले. शेतकरी देशाच्या सन्मानाचा विचार करतो आणि तो असा गोंधळ घालणार नाही, असेही ते म्हणाले.