मोदींचे मंत्रिमंडळ ठरले; 'या' खासदारांना मिळाली संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 01:32 PM2019-05-30T13:32:26+5:302019-05-30T13:46:32+5:30
भाजपाच्या मित्र पक्षांच्या एकेका खासदाराला पहिल्या टप्प्यात मंत्रिपद देण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. याचवेळी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे. आज सायंकाळी 4.30 वाजता मोदी या खासदारांना भेटणार असून त्यांच्याशी चहापानासह चर्चा करणार आहेत. आज 65 मंत्र्यांची शपथ होण्याची शक्यता असून सध्या 31 जणांची नावे समोर आली आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी या खासदारांना फोन करून उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
भाजपाच्या मित्र पक्षांच्या एकेका खासदाराला पहिल्या टप्प्यात मंत्रिपद देण्यात येणार आहे. शिवसेनेकडून अरविंद सावंत, एलजेपीकडून रामविलास पासवान यांचे नाव समोर आले आहे. मात्र, नितिशकुमार यांनी दोन मंत्रीपदे मागितल्याने काहीस पेच निर्माण झाला होता. याचदरम्यान शहा यांनी आज सकाळी दीड-दोन तास मोदी यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी संभावित मंत्रिमंडळातील सदस्यांना फोन केले आहेत.
अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल किंवा त्यांचे पती सुखबीर बादल यांना संधी दिली जाऊ शकते. तसेच अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनाही शहानी फोन केला आहे. तसेच जदयूच्या ललन सिंह आणि पवन वर्मा यांचे नाव असल्याची माहिती मिळत आहे.
सलग दुसऱ्यांदा मिळणार मंत्रिपद
राजनाथ सिंह, नितिन गडकरी , निर्मला सीतारमण, स्मृति इराणी, जितेंद्र सिंह, बाबुल सुप्रियो, हरसिमरत कौर बादल, धमेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी, प्रकाश जावडे़कर, पीयूष गोयल, अनुप्रिया पटेल, रामदास आठवले, मनसुख, गिरिराज सिंह, अर्जुन मेघवाल, किरन रिजिजू, ज्योती निरंजन यांना सलग दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळणार आहे.
नवे चेहरे
अमित शाह, अरविंद सावंत, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, नित्यानंद राय, भूपेंद्र यादव, सुरेश अंगडी, किशन रेड्डी, प्रह्लाद जोशी, प्रल्हाद पटेल, कैलाश चौधरी, कृष्णपाल गुर्जर, पुरुषोत्तम रुपाला, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौड़ा, ललन सिंह, पवन वर्मा, थावरचंद गेहलोत यांची नावे या यादीमध्ये आहेत.