मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल शक्य; नवे चेहरे, जुन्यांना नव्या जबाबदाऱ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 06:34 AM2019-05-27T06:34:34+5:302019-05-27T06:34:53+5:30
राष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या (एनडीए) नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची वेळ आणि ठिकाण रविवारी नक्की झाल्यानंतर आता हे मंत्रिमंडळ कसे असेल हाच कमालीच्या औत्सुक्याचा विषय झाला आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणा-या ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या (एनडीए) नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची वेळ आणि ठिकाण रविवारी नक्की झाल्यानंतर आता हे मंत्रिमंडळ कसे असेल हाच कमालीच्या औत्सुक्याचा विषय झाला आहे.
संभाव्य मंत्रिमंडळावरून माध्यमांमध्ये वर्तविल्या जाणाºया अटकळींचा स्वत: मोदींनी खरपूस समाचार घेतल्यानंतर नेहमीची विश्वसनीय सूत्रे गप्प झाली असली तरी मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात आधीहून मोठे फेरबदल होतील, असे संकेत आहेत.
शनिवारी ‘एनडीए’ संसदीय पक्षाने नरेंद्र मोदी यांची एकमताने नेतेपदी फेरनिवड केल्यानंतर हंगामी पंतप्रधान म्हणून काम पाहणाºया मोदींना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नेमले होते. मंत्रिमंडळाचा शपथविधी केव्हा करावा व मंत्रिमंडळात कोण असावे याविषयी आपल्याला सल्ला द्यावा, असे राष्ट्रपतींनी मोदींना सांगितले होते. त्यानुसार मोदींकडून कळविण्यात आल्यानंतर नव्या मोदी सरकारचा शपथविधी गुरुवार ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात होईल, असे राष्ट्रपती भवनातून रविवारी अधिकृतपणे जाहीर केले गेले. स्वत: मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा रविवारी विजयोत्सव साजरा करण्यासाठी गुजरातमध्ये होते. सोमवारी मोदी काशी विश्वनाथाचे आशिर्वाद घेण्यासाठी व मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीला जातील. त्यामुळे मंत्रिमंडळ स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेण्याच्या हालचाली खºया अर्थाने मंगळवारनंतरच सुरु होतील, असे दिसते. आघाडीतील सहकारी पक्षांना किती मंत्रिपदे द्यायची व भाजपच्या वाट्याला येणारी मंत्रिपदे कोणाला द्यायची. यात व्यक्ती व खाती या दोन्ही बाबीचा समावेश असेल. यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठकही येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे.
>कॅथलिक समाजास मोदींकडून शांतता व भरभराटीची आशा
सुमारे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातील कॅथलिक ख्रिश्चन समाजाने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भव्य यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अघ्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन केले असून त्यांचे सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारा व शांततामय भारत उभा करेल, अशी आशा व्यक्त केली आहे. कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स आॅफ इंडिया या समाजाच्या शीर्षस्थ संस्थेने एका निवेदनात म्हटले की, मोदींच्या काळात भारतात शांतता नांदून देशाची भरभराट होवो, अशी आमची आशा व प्रार्थना असून त्यांसाठी आम्हीही मदत करायला तयार आहोत.
>आचारसंहिता संपली
लोकसभा निवडणुकीसाठी लागू केलेली आचारसंहिता संपली असल्याचे निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केले. १० मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली होती. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याने आाचरसंहितेची बंधनेही संपली असल्याचे निवडणूक आयोगाने केंद्र व सर्व राज्यांच्या सरकारांना कळविले आहे.
>जाणकारांना अपेक्षित आहेत अनेक बदल
काही बदल अपरिहार्यता म्हणून तर काही राजकीय गरज म्हणून
अरुण जेटली व सुषमा स्वराज यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे वित्त व परराष्ट्र या दोन महत्त्वाच्या खात्यांसाठी नवे मंत्री ठरवावे लागतील.
पक्षाध्यक्ष अमित शहा मंत्रिमंडळात येण्यास राजी झाले तर त्यांनाही त्यांच्या मोठेपणाला साजेसे खाते द्यावे लागेल. गृह मंत्रालय राजनाथ सिंग यांच्याकडेच ठेवायचे की अन्य कोणाला द्यायचे हे अमित शहांचा होकार-नकार व लोकसभा अध्यक्ष कोण होईल, यावर अवलंबून असेल.
याशिवाय आधीच्या मंत्रिमंडळात उत्तम कामगिरी केलेल्या मंत्र्यांना अधिक मोठी जबाबदारी देण्यासाठीही काही बदल करावे लागतील. या विजयात मोठा वाटा असलेल्या प. बंगालसह पूर्व भारतातील राज्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठीही फेरबदल करावे लागतील.