मोदींच्या 'या' चाणक्याने पाकिस्तानला घडवली अद्दल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2016 12:43 PM2016-09-30T12:43:22+5:302016-09-30T13:09:40+5:30
भारताने नियंत्रण रेषा ओलांडून आपली 'strategic restraint' म्हणजे 'लष्करी पर्याय टाळण्याचे' जे जुने धोरण आहे त्यात बदल केल्याचा स्पष्ट इशारा पाकिस्तानला दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - लष्कराच्या स्पेशल फोर्सेसनी बुधवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून आपली 'strategic restraint' म्हणजे 'लष्करी पर्याय टाळण्याचे' जे जुने धोरण आहे त्यात बदल केल्याचा स्पष्ट इशारा पाकिस्तानला दिला आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर हा बदल अधिक ठळकपणे दिसत असला तरी या धोरणाची सुरुवात सात ऑक्टोंबर २०१४ मध्येच झाली होती.
दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानने जेव्हा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करुन भारतीय चौक्यांवर गोळीबार केला तेव्हाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बीएसएफच्या महासंचालकांना बोलवून पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तानकडून किरकोळ गोळीबार झाला तरी त्याला जोरदार प्रत्युत्तर द्या असे त्यावेळीच अजित डोवाल यांनी बीएसएफ महासंचालकांना बजावले होते.
तुम्ही तुमच्या पद्धतीने पाकिस्तानी रेंजर्सना प्रत्युत्तर द्या त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट करा. समोरुन गोळीबार थांबत नाही तो पर्यंत तुमची कारवाई चालू ठेवा असे डोवाल यांनी बीएसएफ महासंचालकांना सांगितले होते. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानी रेंजर्सबरोबर कुठलीही फ्लॅग मिटींग करु नका असे त्यांनी बीएसएफ महासंचालकांकडे स्पष्ट केले होते.
डोवाल यांच्या या रणनितीचा लगेच परिणाम दिसून आला. भारताच्या गोळीबारामुळे पाकिस्तानच्या बाजूला मोठे नुकसान सुरु झाल्यानंतर युद्धखोर पाकिस्तानने लगेच युद्धविरामाचे झेंडे फडकवले. मे २०१४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर लष्कराने प्रथमच इतकी आक्रमक भूमिका घेतली. भारताचे हे धोरण आजही कायम आहे.
मागच्यावर्षी ऑक्टोंबरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक जनरल उमर फारुख बुरकी नवी दिल्लीत चर्चेसाठी आले होते. त्यावेळी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून मोठया प्रमाणावर गोळीबार सुरु झाला. डोवाल आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी लगेचच बीएसएफला पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे आदेश दिले.
प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या बाजूला २६ नागरीक ठार झाले.त्यावेळी बुरकी यांनी हॉटलाईनवरुन बीएसएफ महासंचालकांबरोबर चर्चा केली व त्यांना गोळीबार थांबवण्याची विनंती केली अशी माहिती सूत्रांनी दिली.
मागच्यावर्षी जून महिन्यात भारतीय लष्कराच्या कमांडोनी म्यानमारच्या हद्दीत घुसून एनएससीएन(के) च्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. या मोहिमेमागे अजित डोवालच होते. पंतप्रधानपदी मोदी आणि एनएसए पदी अजित डोवाल आल्यानंतर मागच्या दोनवर्षात भारताच्या संरक्षण धोरणात अमूलाग्र बदल झाला आहे. भारतीय संरक्षण दलाचे मनोबल वाढवणारे अनेक निर्णय घेण्यात आले. पाकिस्तानलाही वेळोवेळी या बदलांची जाणीव करुन देण्यात आली.
कोण आहेत अजित डोवाल
अजित कुमार डोवाल हे १९६८ च्या आयपीएस बॅचचे केरळ केडरचे निवृत्त अधिकारी आहेत. २० जून १९४५ मध्ये एका गडवाली ब्राम्हण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सध्या ते भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. डोवाल यांनी आपल्या कार्यकाळात बराच काळ गुप्तचर खात्यामध्ये काम केले आहे. २००४-०५ मध्ये ते भारताच्या गुप्तचर खात्याचे संचालक होते. भारताच्या गुप्तचर खात्याच्या ऑपरेशनल विंगचे दशकभर त्यांनी प्रमुखपद भूषवले.
मिझोराम, पंजाबमध्ये अनेक बंडखोर विरोधी मोहिमांमध्ये ते सक्रीय होते. १९९९ साली अपहरण झालेल्या आयसी-८१४ विमानामधील प्रवाशांच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांबरोबर ज्या तिघांनी चर्चा केली त्यामध्ये डोवाल यांचा समावेश होता.
पंजाबमध्ये ऑपरेशन ब्लॅक थंडरपूर्वी महत्वाची माहिती गोळा करण्यासाठी काही काळ ते पंजाबच्या सुवर्णमंदिरातही थांबले होते. गुप्तचर म्हणून त्यांनी पाकिस्तानातही काही काळ घालवला आहे. प्रत्यक्ष गुप्तचर मोहिमांचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा भारताला सध्या फायदा होत आहे.