निवडणूक आयोगाची मोदींना ‘क्लीन चिट’
By admin | Published: October 11, 2014 12:35 AM2014-10-11T00:35:35+5:302014-10-11T00:35:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात ‘आकाशवाणी’वरून केलेल्या ‘मन की बात’ या भाषणाने निवडणूक आचारसंहितेचा कोणताही भंग झालेला नाही,
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात ‘आकाशवाणी’वरून केलेल्या ‘मन की बात’ या भाषणाने निवडणूक आचारसंहितेचा कोणताही भंग झालेला नाही, असा निर्वाळा देत निवडणूक आयोगाने मोदींना ‘क्लीन चिट’ दिली आहे.
मोदींच्या ३ आॅक्टोबरच्या या भाषणाबद्दल अ.भा. काँग्रेस समितीच्या कायदा व मानवी हक्क विभागाचे सचिव के. सी. मित्तल यांनी ६ आॅक्टोबर रोजी आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर आयोगाचा निर्णय कळविणारे पत्र आयोगाचे प्रधान सचिव के. अजयकुमार यांनी शुक्रवारी मित्तल यांना पाठविले.
या पत्रात मित्तल यांनी म्हटले आहे की, प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने मोदी यांच्या भाषणाची ध्वनिफीत ऐकली व त्याचा लेखी तर्जुमाही वाचला. त्यावरून या भाषणाने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे दिसत नाही, असा निष्कर्ष आयोगाने काढला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)