मोदींच्या "स्वच्छ भारत"ला घरचा अहेर, मंत्र्याची उघड्यावर लघुशंका
By Admin | Published: June 29, 2017 08:10 AM2017-06-29T08:10:39+5:302017-06-29T09:55:54+5:30
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात ""स्वच्छता अभियान"" राबवत आहेत, मात्र दुसरीकडे त्यांच्याच कॅबिनेटमधील एक मंत्री स्वच्छता अभियानाला हरताळ फासताना दिसत आहेत.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात ""स्वच्छ भारत अभियान"" राबवत आहेत, मात्र दुसरीकडे त्यांच्याच कॅबिनेटमधील एक मंत्री स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासताना दिसत आहेत.
हे मंत्री दुसरे-तिसरे कुणी नसून केंद्रीय कृषि मंत्री राधा मोहन सिंह आहेत. केंद्रीय कृषि मंत्री राधामोहन सिंह यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात ते उघड्यावर लघवी करत आहेत.
कृषि मंत्र्यांचा हे व्हायरल होणारे फोटो त्यांच्या चिंता वाढवणा-या आहेत. दरम्यान राधामोहन सिंह यांचे हे फोटो कुठले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र हे फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्विट केले जात आहेत.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा जोरदार प्रचार व प्रसार सुरू आहे. स्वतः पंतप्रधान मोदी अनेक गावं हगणदारीमुक्त झाल्यानं त्यांचे कौतुक करत आहेत. देशवासियांना स्वच्छता राखण्याबाबत प्रोत्साहन देत आहेत. देशातील प्रत्येक गावात शौचायलं बांधण्यात येत आहेत. तर दुसरीकडे राधा मोहन सिंह यांचे उघड्यावर लघवी करणारे फोटो व्हायरल झाल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका तर होत आहेच, मात्र त्यांची थट्टादेखील केली जात आहे.
यापूर्वीही बेताल वक्तव्य केल्यानं राधा मोहन सिंह अडचणीत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांना मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन व तेथे पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या 5 शेतक-यांबाबत वार्ताहरांनी प्रश्न विचारला असता, राधामोहन सिंह म्हणाले की ""योगा करा"", असे धक्कादायक आणि अजब उत्तर राधामोहन सिंह यांच्याकडून मिळाले होते.
राधामोहन सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांनी आयोजित केलेल्या तीन दिवसीय योग शिबिराचे बिहारमधील मोतिहारी येथे (8 जून) उद्घाटन केले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी विचारलेल्या शेतकरी प्रश्नावर राधामोहन यांनी ""योगा करा"" असे सांगत मुद्दा टाळला होता.