मोदींची तुलना महात्मा गांधी आणि शास्त्रींशी
By admin | Published: May 17, 2016 04:48 AM2016-05-17T04:48:55+5:302016-05-17T04:48:55+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महात्मा गांधी यांच्याशी करीत अन्य स्तुतिपाठकांना मागे टाकले
दाहोद : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महात्मा गांधी यांच्याशी करीत अन्य स्तुतिपाठकांना मागे टाकले आहे. एकेकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे म्हणणे संपूर्ण जग लक्षपूर्वक ऐकायचे. आज जग मोदींचे ऐकत आहे, असे ते म्हणाले. मात्र मोदींवर उधळण्यात आलेल्या स्तुतिसुमनांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील दाहोद येथे ‘पंतप्रधान उज्ज्वला योजने’च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पक्षाध्यक्ष अमित शहा, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात शहा यांनी मोदींची तुलना माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याशी केली. त्या काळी अन्नटंचाईमुळे शास्त्री यांनी लोकांना स्वेच्छेने एकवेळचे भोजन सोडून देण्याचे आवाहन केले होते. मोदींनीही सधन लोकांना एलपीजी सबसिडी सोडून देण्याचे आवाहन केले आहे. मोदींना मिळालेला प्रतिसाद अन्य कोणत्याही पंतप्रधानांना मिळाला नाही, या शब्दांत शहा यांनी मोदींची प्रशंसा केली.
शास्त्री यांनी लोकांना डाळ-भात खाणे थांबवा असे आवाहन केले होते. त्यांना जोरदार प्रतिसाद देत लोकांनी ते खाणे थांबविले होते. आता मोदींच्या आवाहनावरून एक कोटी लोकांनी गॅस सबसिडी सोडली आहे, असे ते म्हणाले. मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे, असे आनंदीबेन पटेल म्हणाल्या. मोदी नेहमीच गरिबांच्या भल्यासाठी काम करण्यावर विश्वास ठेवतात, असे राजे यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)
वेंकय्या नायडूंवर काँग्रेसची टीका...
अलीकडेच केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी मोदी हे भारताला देवाने दिलेली भेट (गॉडस् गिफ्ट) आहे, असे विधान केल्यानंतर काँग्रेसने तीव्र टीका केली होती. देवकांत बरूआ यांनी ‘इंडिया इज इंदिरा’ आणि ‘इंदिरा इज इंडिया’ असे विधान केल्यानंतर त्या काळी त्यांना विरोधकांनी धारेवर धरले होते. त्या विधानाच्या तुलनेत नायडूंनी केलेली तुलना खूप वेगळी आहे काय, असा सवालही काँग्रेसने उपरोधिकपणे केला होता. पक्षाध्यक्ष शहा यांच्यासह चौहान आणि अन्य मुख्यमंत्र्यांनी केलेली मोदींची स्तुती पुन्हा एकदा वादाचा विषय ठरू शकते.