लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मोदींच्या देशव्यापी विजयात बिहारचीही साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 03:20 AM2019-05-24T03:20:55+5:302019-05-24T03:22:24+5:30
नितीशकुमार, रामविलास पासवान व सुशीलकुमार मोदी यांनी विकासाचा मुद्दा चर्चेत ठेवून खेचून आणली विजयश्री
- सुमंत अयाचित
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशव्यापी विजयाला ‘विकासपुरुष’ नितीशकुमार व रामविलास पासवान यांच्या बिहारने जबरदस्त साथ दिली. एकूण ४० जागा असलेल्या बिहारकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (पाटणासाहिब), राधामोहन सिंह (पूर्व चंपारण), गिरीराज सिंह (बेगूसराय), आर. के. सिंह (आरा) व अश्विनीकुमार चौबे (बक्सर) मैदानात उतरले होते. या सर्वांनी यश मिळविले असले, तरी अन्य एक केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव हे पाटलीपुत्रमधून पिछाडीवर गेले. लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी तेथे विजयश्री खेचून आणली. किशनगंज जागेवरून काँग्रेसचे मोहम्मद जावेद यांनी यश मिळविले. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने सहा जागा लढविल्या होत्या व सर्व जागा त्यांनी राखल्या आहेत. विरोधकांतील दिग्गज नेते शरद यादव (मधेपुरा), अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (पाटणासाहिब), लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीराकुमार (सासाराम), जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार (बेगूसराय), रालोसपा प्रमुख उपेंद्र कुशवाह (काराकाट), विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी (खगडिया) व हम (एस) प्रमुख जितनराम मांझी यांच्या कारकिर्दीला धक्का दिली. भाजपने येथे १७ जागा लढविल्या होत्या. कमकुवत विरोधक विरुद्ध सशक्त सत्ताधारी अशीच ही निवडणूक झाली.
टीआरएसचा गड आला पण सिंह गेला...
तेलंगणामध्ये सर्वाधिक जागा जिंकून तेलंगणा राष्ट्र समितीने आपला गड राखला, तरी टीआरएसचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांना निजामाबादमधून पराभव झाला. त्यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी स्थिती केसीआर यांची झाली.
लोकाभिमुख योजनांचा पॅटर्न उभा करणाऱ्या सत्तारुढ तेलंगणा राष्ट्रसमितीला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. देशातील सर्वाधिक उमेदवारांची संख्या असलेली लक्षवेधी लढत निजामाबादमध्ये झाली. यात एआयएमआयएमचे प्रमुख खा. डॉ. असुदोद्दीन ओवेसी यांनी विजय मिळविला.