मोदींच्या पदव्या भाजपाने केल्या जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2016 03:22 AM2016-05-10T03:22:31+5:302016-05-10T03:22:31+5:30
भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीए आणि एमएची पदवी जाहीर केली असली तरी या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष संपायला तयार नाही.
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीए आणि एमएची पदवी जाहीर केली असली तरी या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष संपायला तयार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदव्यांबाबत केलेले आरोप भाजपाने बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे तर आम आदमी पार्टीने या पदव्या बनावट असल्याचा आरोप केला आहे.
मोदी यांच्या शैैक्षणिक पात्रतेवर केजरीवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला भाजपाने उत्तर दिले. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केजरीवाल यांनी मोदी यांच्यावर आरोप करून राजकारणाची सीमा ओलांडली असल्याची टीका केली. ते म्हणाले, ‘‘दिशाभूल केल्याबद्दल केजरीवाल यांनी क्षमा मागावी. आरोप कशाच्या आधारावर करीत आहोत हे केजरीवाल यांनी सांगावे.’’ त्याआधी शाह म्हणाले होते की, ‘‘मोदी यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए आणि एमएची (राज्यशास्त्र) पदवी गुजरात विद्यापीठातून मिळविली. पंतप्रधानांच्या शैैक्षणिक पात्रतेवरून पत्रकार परिषद घ्यायची वेळ यावी ही दुर्दैवी बाब आहे. गेल्या काही दिवसांत पदव्यांवरून केजरीवाल यांनी चुकीची विधाने केली आहेत. मी बीए आणि एमएची पदवी सार्वजनिक करीत आहे.’’ या दोन्ही पदव्यांच्या प्रती शाह यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केल्या.
शाह यांच्यासोबत उपस्थित असलेले अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, ‘‘१९७८मध्ये पंतप्रधान दिल्ली विद्यापीठात परीक्षा द्यायला यायचे. ते तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात थांबत. त्या वेळी त्यांचा लोकांशी जास्त संपर्क नव्हता; परंतु अभाविपचा अध्यक्ष या नात्याने ते अनेकवेळा माझ्या संपर्कात आले.’’
> आप म्हणते, भाजपाने दाखविली मोदींची बनावट पदवी!
भाजपाने मोदी यांच्या दाखविलेल्या पदव्या या बनावट असून, देशाची दिशाभूल करणाऱ्या असल्याची टीका आम आदमी पार्टीने केली. आपचे प्रवक्ते आशुतोष म्हणाले की, एका पदवीवर नरेंद्रकुमार दामोदरदास मोदी लिहिले व एमएच्या पदवीवर नरेंद्र दामोदरदास मोदी लिहिले आहे. आशुतोष म्हणाले की, नाव बदलण्यास शपथपत्र द्यावे लागते. अमित शाह यांनी ते शपथपत्रही सादर करायला हवे. आशुतोष यांच्या म्हणण्यानुसार, गुणपत्रिका १९७७मध्ये दिली गेली तर पदवीवर १९७८ लिहिले आहे. त्यांनी ही पदवी बनावट असल्याचे म्हटले. मोदी यांना वाचविण्यासाठी शाह आणि जेटली यांनीच फेरफार केला.