लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचे तीन आघाड्यांवर ‘लक्ष’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 04:33 AM2018-04-11T04:33:42+5:302018-04-11T04:33:42+5:30
२०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तीन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करायचे ठरविले आहे.
नवी दिल्ली : २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी तीन आघाड्यांवर लक्ष केंद्रित करायचे ठरविले आहे. विशिष्ट क्षेत्रे निश्चित करून त्यासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्यक्षेत्रासाठीची आयुष्मान योजना आणि ग्रामीण भागामधील गृहनिर्माण योजनेच्या अंमलबजावणीचा वेग वाढविणे या त्या तीन आघाड्या आहेत.
अलीकडेच काही राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले, दलित संघटनांनी केलेली निदर्शने, उजेडात आलेले बँकिंग घोटाळे, दाखल झालेले अविश्वास ठराव, संसदेत कामकाज न होणे, एनडीएमधून काही घटक पक्ष बाहेर पडणे अशा भाजपाच्या दृष्टीने अप्रिय घटना घडत आहेत. सरकारने केलेली ठोस कामे आगामी निवडणुकीआधी जनतेसमोर मांडण्यासाठी केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, या आघाडीवर मोदींनी लक्ष केंद्रित केलेले आहे.
आयुष्मान भारत योजनेवर भर
दुसरी आघाडी म्हणजे आरोग्यक्षेत्रासाठी राबविण्यात येणारी आयुष्मान भारत योजना. अशा अनेक योजना असताना आयुष्मान भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून ठोस काम केल्याचे केंद्राला दाखवून द्यायचे आहे. या योजनेची फळे दिसण्यासाठी अजून एक वर्षाचा कालावधी जावा लागणार आहे.
गृहनिर्माण योजनेबाबत समाधान
ग्रामीण भागात गृहनिर्माण योजना प्रभावीरीत्या राबविणे या तिसºया आघाडीवर मोदींनी भर दिला आहे. या योजनेची आजवरची प्रगती समाधानकारक असल्याचे मोदींचे मत आहे. या योजनेतून जनतेला गृहबांधणीसाठी बँकांकडून सहजतेने कर्जे मिळावीत म्हणून केंद्र सरकारने काही निर्णय घेतले आहेत.